हिंगणवेढे शिवारात भरदिवसा बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:46 PM2018-12-26T23:46:04+5:302018-12-27T00:35:48+5:30
येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारात भरदिवसा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
एकलहरे : येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारात भरदिवसा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. काल रात्री दोन पाळीव कुुत्र्यांवर बिबट्याने हल्ला चढवून जखमी केल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. एकलहरे-हिंगणवेढे शिव रस्त्यालगत मळ्यांमध्ये शेतकरी वस्ती करून राहतात. आजूबाजूला उसाचे भरपूर क्षेत्र असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. या परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्याची मादी व तीन बछडे यांचा संचार असून, त्यांनी आतापर्यंत अनेक कुत्रे, बकरे, वासरे फस्त केले आहेत. साहेबराव निवृत्ती धात्रक यांच्या दोन पाळीव कुत्र्यांवर मंगळवारी रात्री ९ वाजेदरम्यान बिबट्याने हल्ला करून ओढून नेले. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे नागरिकांनी बँटऱ्यांच्या प्रकाशात बिबट्याच्या दिशेने दगडगोटे भिरकावल्याने जखमी कुत्र्याला सोडून बिबट्याने उसामध्ये पलायन केले. या कुत्र्याच्या गळ्यात लोखंडी अनकुचिदार पट्टा असल्याने त्याचा जीव वाचला असला तरी, त्याच्या अंगावर व गळ्याभोवती अनेक ठिकाणी बिबट्याच्या दातांच्या जखमा झाल्या आहेत.
या बिबट्याने आतापर्यंत रामकिसन गणपत मोरे यांची शेळी, अशोक तुकाराम धात्रक यांची गाय, यमाजी नामदेव नागरे, भारत पुंजा पवळे, संतोष सुरेश धात्रक (उपसरपंच) यांचे कुत्रे, जयराम पंढरीनाथ राजोळे व शरद कारभारी राजोळे यांचे कुत्रे व वासरू फस्त केले आहे. सध्या सर्वत्र ऊसतोड झाली आहे. क्वचित एक-दोन ठिकाणी शेतात ऊस उभा आहे. या ठिकाणीच बिबट्या मादी व तिच्या तीन पिलांचा मुक्काम आहे. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
गेल्या एक ते दीड वर्षापासून या परिसरात बिबट्याची मादी व तिची तीन पिले वास्तव्य करून आहेत. दिवसाढवळ्याही त्यांचे अनेकदा दर्शन झाले आहे. या मादी बिबट्याने अनेक जनावरे फस्त केली आहेत. ऊसतोड झाल्याने आता लपायला जास्त जागा नाही. मात्र एक-दोन ठिकाणचा ऊस व काटेरी झाडेझुडप्यांमध्ये बिबट्याचे वास्तव्य आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा.
- संपत निवृत्ती धात्रक, हिंगणवेढे