पर्यटकांना मिळणार शुद्ध पाणी अन् विश्रांती
By admin | Published: January 17, 2016 10:36 PM2016-01-17T22:36:35+5:302016-01-17T22:39:06+5:30
नांदूरमधमेश्वर अभयारण्य : इको हट, जलशुद्धीकरण यंत्राची उभारणी
नाशिक : राष्ट्रीय पक्षी अभयारण्य म्हणून नावलौकिक प्राप्त असलेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात असलेल्या तोकड्या सोयीसुविधांबाबत नेहमीच पर्यटकांकडून ओरड केली जात होती. त्यामुळे वनविभागाच्या वतीने सुमारे लाखो रुपयांचा निधी या ठिकाणी विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून, जलशुद्धीकरण यंत्र, विश्रांतीसाठी इको हट, पॅगोडे व भव्य आकर्षक स्वागत कमान उभारणीच्या कामांना अभयारण्याच्या परिसरात प्रारंभ झाला आहे.
गोदावरी-कादवा नदीच्या संगमावर नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणथळ जागेवर हिवाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी हजारो देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी भूक भागविण्यासाठी येतात. पक्षिनिरीक्षणासाठी राज्यासह परराज्यांतूनही पक्षिप्रेमी मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतात. येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये, त्यांना पक्षिनिरीक्षण सुलभरीत्या करता यावे, यासाठी वनविभागाकडून विविध सोयीसुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, निरीक्षण मनोरे, प्रसाधनगृहाच्या दुरवस्थेबाबत तक्रार केली जात होती. महिलांसाठी नवीन प्रसाधनगृहासह विश्रांतीसाठी दोन पॅगोडे व तीन इको हटची उभारणी करण्यात आली आहे. शुद्ध पिण्याचे पाणी पर्यटकांना उपलब्ध व्हावे, म्हणून जलशुद्धीकरण यंत्रणा येथे बसविण्यात आली आहे.