व्हायरल फोटोमुळे घडली पवार आजोबांची भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 04:17 PM2019-12-26T16:17:17+5:302019-12-26T16:18:02+5:30
चिमुरड्या गार्गीची ‘सोशल’ कहाणी : आहेर कुटुंबीयांनी अनुभवला भाग्याचा क्षण
बाजीराव कमानकर , सायखेडा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतात राष्टवादी कॉँग्रेस पक्षाचा ध्वज शेतात मिरविणाऱ्या चिमुरड्या गार्गीचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि राष्टवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांचे हजारो लाइक्स आणि कमेंटस्चा वर्षाव या छायाचित्रावर झाला. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या फेसबुकवर प्रोफाइल बनलेल्या या छायाचित्रातील गोंडस चिमुरडी नेमकी कोण आणि कुठे राहते, याचा शोध पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परिक्षित तलोरकर यांनी सुरू केला आणि हा शोध अखेर निफाड तालुक्यातील चांदोरी येथे येऊन थांबला. तलोरकरांनी शरद पवार यांचे छायाचित्र गार्गीला दाखविल्यानंतर तिने पवार आजोबांना भेटण्याचा हट्ट धरला आणि मुंबईतील सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी गार्गीने आपल्या पालकांसह शरद पवारांची भेट घेतली. मग पवार आजोबांनीही आपल्या पक्षाचा ध्वज मिरविणा-या या भविष्याला वर्तमानाचा हात पुढे करत मायेचा आशिर्वाद दिला. या प्रसंगाने आहेर कुटूंबियांबरोबरच उपस्थित नेते व कार्यकर्तेही भारावले.
सागर आणि प्रियंका आहेर हे दाम्पत्य निफाड तालुक्यातील चांदोरीत वास्तव्यास आहे. त्यांना तीन वर्षांची गार्गी ही मुलगी आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सर्वत्र प्रचारसभांचा धुरळा उडाला होता. निफाड तालुक्यात राष्टवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभाही होऊन गेली होती. त्या काळातच राष्ट्रवादीचा ध्वज हाती लागलेली गार्गी शेतात बागडत होती. तिच्या हाती डौलाने फडकणारा हा ध्वज पाहून सागर आहेर यांनी आपल्या मोबाईलमध्ये तिची छबी टिपली आणि गार्गीचा हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. चिमुरड्या गार्गीचा पक्षध्वजासह असलेल्या या फोटोला म्हणता म्हणता हजारोच्या संख्येने लाईक्स व कमेंटस् मिळाल्या. निवडणुक काळात प्रचंड व्हायरल झालेल्या या फोटोमधील मुलगी नेमकी कोण आणि कुठली असावी याचा शोध पुणे येथील राष्टवादीचे कार्यकर्ते व शरद पवार यांचे जवळचे स्नेही परिक्षित तलोरकर यांनी घ्यायला सुरुवात केली आणि फोटोतील मुलगी ही निफाड तालुक्यातील चांदोरीची असल्याची खबर मिळाली. तलोरकरांनी थेट चांदोरी गाठत गार्गीसह तिच्या पालकांची भेट घेतली. गार्गीशी गप्पा मारल्यानंतर तिला शरद पवार यांचे छायाचित्र दाखविल्यानंतर टीव्हीवरच त्यांना पाहणाºया गार्गीने पवार आजोबांना भेटण्याचा हट्ट धरला. तलोरकरांनी लगोलग शरद पवारांशी संपर्क साधून त्यांना घटनाक्रम कथन केला. पवार यांनीही तत्काळ भेटीचे आमंत्रण दिले. त्यानुसार, मुंबईतील सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी आहेर कुटुंबीय पोहोचले आणि शरद पवार यांनी तब्बल अर्धातास या कुटुंबासोबत घालविला. गार्गीला जवळ घेत त्यांनी तिच्याशी गप्पाही मारल्या. शरद पवार यांच्या व्यस्त कार्यक्रमातही त्यांनी वेळ दिल्याने आहेर कुटुंबीय भारावून गेले.
प्रदेशाध्यक्षांच्या प्रोफाइलमध्ये स्थान
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तर हा फोटो इतका भावला की त्यांनी तो आपल्या फेसबुकवरचा प्राफाईल केला. पक्षानेही अनेक ठिकाणी डिजीटल प्रचारात त्याचा वापर केला. निवडणूक काळात सोशल मिडियावरील या फोटोनेही शरद पवार यांच्या दौºयाइतकीच धूम केली. असंख्य कार्यकर्त्यांनी हा फोटो व्हाटस्अपचा डीपी म्हणूनही ठेवला होता. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या फोटोने गार्गीला प्रचंड प्रसिदद्धी तर मिळालीच शिवाय बोनस म्हणून शरद पवार यांची भेट घेण्याचा योगही चालून आला.