सातपूरमध्ये विकासाच्या नावे बकालपणा
By admin | Published: November 28, 2015 10:45 PM2015-11-28T22:45:25+5:302015-11-28T22:48:12+5:30
नागरिकांचे उपोषण : महापालिका अधिकारी जबाबदार; चौकशीची मागणी
नाशिक : सातपूर विभागात महापालिकेकडून अतिक्रमणे, रस्ते, नासर्डी नदीची स्वच्छता, पथदीप, व्यायामशाळा, क्रीडांगणे आदिंबाबत केला जात असलेला विकासाचा दावा दिशाभूल करणारा असून, विकासाच्या नावे केवळ बकालपणाच केल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. उपोषणात विभागातील सर्वच नगरसेवकांनी सहभागी होत, महापालिका आयुक्तांनी याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी केली.
सातपूर प्रभाग सभेत विविध विषय चर्चिले जात असताना स्थानिकांनी सर्व नगरसेवकांनी उपोषणात सहभागी होण्याची मागणी करीत विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी प्रभाग सभापती उषा शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये सातपूर-अबंड लिंक रोडला बेकायदेशीर अतिक्रमणे असताना अधिकारी केवळ त्याभागात फेरफटका मारतात. अधिकारी अर्थकारणात गुंतलेले असल्याने या भागातील अतिक्रमणे अजूनही ‘जसै थे’च आहेत. तसेच विभागातील रस्त्यांवर २००७ पासून केलेला खर्च संशयास्पद असून, याची आयुक्तांनी चौकशी करणे आवश्यक आहे. संपूर्ण विभागात ड्रेनेज लाइनची समस्या असून, त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. विभागातील बहुतेक पथदीप बंद असल्याने चोऱ्यांच्या घटना नियमित घडत आहेत. शिवाय या भागात घंडागाडीची समस्या असून, तीन ते चार दिवस घंडागाडी फिरकतच नसल्याच्या तक्रारी आहेत. उद्याने, क्रीडांगणे, व्यायामशाळा, सभागृह यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी यासर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून नागरिकांना मूलभूत सुविधा करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, नागरिकांच्या उपोषणाला नगरसेवक दिनकर पाटील, लता पाटील, प्रकाश लोंढे, नंदिनी जाधव, उषा अहिरे, अमोल पाटील यांनी पाठिंबा दिला. उपोषणात लक्ष्मण जपे, भरत सोनवणे, रमेश येवले, प्रेमानंद ठाकरे, नवनाथ शिंदे, भिकन खाटीक, गणेश गायकवाड, शांताराम सोनवणे, नारायण पठारे, शिवाजी वडणे आदिंनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)
सातपूरवासीयांच्या उपोषणात सहभागी झालेले प्रभाग सभापती उषा शेळके, नगरसेवक दिनकर पाटील, लता पाटील, प्रकाश लोंढे, नंदिनी जाधव, उषा अहिरे, अमोल पाटील आदि.