आझाद मैदानावर घुमला नाशिककरांचा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:57+5:302020-12-15T04:31:57+5:30
नाशिक : मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे ...
नाशिक : मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत एसईबीसी प्रवर्गातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाजी केली.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी प्रवर्गातून विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप मराठा संघटनांकडून केला जात असून, अशा उमेदवारांना त्यांनी उत्तीर्ण केलेल्या स्पर्धा परीक्षांनंतर शासकीय नोकरीत सामाविष्ट करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रविवारीच मुंबईत पोहोचले होते. तर सोमवारी सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रस्त्यातच अडविल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. दरम्यान, मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांनी राज्याील आमदारांसह विरोधी पक्ष नेत्यांना सभागृहात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांचा प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावला नाही, तर मराठा समाज यापुढे आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, विजय खर्जुल, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, किरण बोरसे, भारत पिंगळे, वैभव दळवी, प्रवीण घोडे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, दिनेश खडतरे, दुर्गेश कामतेकर, रमेश पांडे आदींनी मुंबईत दाखल होत या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
इन्फो
राज्य सरकारने सारथी शिक्षणसंस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीच्या भगिनीला न्याय यासारख्या मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण होत आहे. आता सरकार न्यायाची भूमिका घेत नसेल तर मराठा बांधवांच्या भावनांचा होणारा उद्रेक हा असह्य असेल. येत्या दोन दिवसांमध्ये राज्य सरकारने मराठा उमेदवारांचे सोडवावेत.
- करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
(फोटो- १४मराठा रिजर्वेशन) मुंबईतील आझाद मैदनावर नियुक्तीच्या प्रतीक्षेतील मराठा उमेदवारांच्या आंदोलनात सहभागी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, नवनाथ शिंदे ,विजय खर्जुल, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, किरण बोरसे, भारत पिंगळे, वैभव दळवी, प्रवीण घोडे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, दिनेश खडतरे, दुर्गेश कामतेकर, रमेश पांडे आदी.