शहरात आज भाजीवाल्यांचा आवाज गुंजलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:22+5:302020-12-09T04:11:22+5:30
नाशिक : एरवी दररोज दिवस उजाडताच शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये भाजीवाल्यांचा आवाज गुंजतो, मात्र मंगळवारी सकाळी हा आवाज नाशिककरांच्या कानी ...
नाशिक : एरवी दररोज दिवस उजाडताच शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये भाजीवाल्यांचा आवाज गुंजतो, मात्र मंगळवारी सकाळी हा आवाज नाशिककरांच्या कानी पडलाच नाही, कारण शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी दिल्लीतून पुकारलेल्या ‘भारत बंद’ या आंदोलनात कानाकोपऱ्यातील शेतकरी सहभागी झाला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर जाणे पसंतच केले नाही. शेतमालाचा उठाव होऊ शकला नाही, आणि बाजार समित्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा शेतमाल बळीराजाने पोहोचविला नाही, यामुळे नागरिकांची चांगलीच फजिती झाली. परिणामी नाशिककरांना मंगळवारच्या भोजनात पालेभाज्यांव्यतिरिक्त डाळींवर भर द्यावा लागला. शहरातील विविध उपनगरांमधील भाजी मंडईंमध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला. काही ठराविक चौकांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी भरणारा भाजीबाजार मंगळवारी सकाळी गजबजला नाही. नाशिकरोडमधील बिटको चौकात उड्डाणपुलाखाली भाजी बाजाराची लगबग दिसली नाही. सातपूरच्या भाजी मंडईदेखील ओस पडलेली होती. साईनाथनगर भाजीबाजारही सकाळी भरला नाही. भद्रकाली भाजीबाजारातही शुकशुकाट दिसून आला. भाजीपाला नाशिककरांना मिळणे मुश्कील झाले होते. यामुळे बहुतांश चाकरमान्यांनासुद्धा आज डब्यांमध्ये कुठल्याहीप्रकारच्या पालेभाज्या मिळू शकल्या नाहीत.