स्वेच्छेने जबाबदारी स्वीकारून ‘ते’ झाले कोरोनायोद्धे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:26 PM2020-06-03T22:26:48+5:302020-06-04T00:47:59+5:30
नाशिक : कोरोना असे नाव घेतले तरी सामान्यांना भीती वाटते. अनेक शासकीय अधिकारी तर केवळ आपल्याला बंधनकारक आहे, म्हणून यासंदर्भातील सेवा देत असताना नाशिकमध्ये दोन अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारून कोरोनाशी दोन हात करण्यात सक्रिय सहभाग दिला आहे.
नाशिक : (संजय पाठक ) कोरोना असे नाव घेतले तरी सामान्यांना भीती वाटते. अनेक शासकीय अधिकारी तर केवळ आपल्याला बंधनकारक आहे, म्हणून यासंदर्भातील सेवा देत असताना नाशिकमध्ये दोन अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारून कोरोनाशी दोन हात करण्यात सक्रिय सहभाग दिला आहे. यातील उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची बदली झाल्यानंतर सध्या नव्या ठिकाणी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना काम सुरू केले, तर मालेगाव महापालिकेचे सेवानिवृत्त आयुक्त जीवन सोनवणे यांनीदेखील जोखीम पत्करून जबाबदारी स्वीकारली आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे मात्र अन्य अधिकाºयांचे मनोबल उंचविण्यास मदत झाली आहे.
मालेगावला एकापाठोपाठ एक रुग्ण आढळत गेले आणि मालेगाव हॉटस्पॉट बनले. मालेगावला जाणे किंवा तेथून परत येणे हेदेखील सर्वांनाच भीतिदायक वाटत असताना याच महापालिकेत यापूर्वी आयुक्त म्हणून काम केल्याचा पूर्वानुभव असलेले जीवन सोनवणे पुढे आले. खरे तर ३८ वर्षे शासकीय सेवा बजावल्यानंतर २०१७ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वय साठ झालेले आहे. अशा वयोगटातील नागरिकांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे माहिती असतानाही त्यांनी जोखीम पत्करली आणि मालेगावमध्ये काम केल्याचा अनुभव कामी येईल म्हणून प्रत्यक्ष काम करण्याची इच्छा त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनीदेखील मान्यता दिली आणि त्यानुसार त्यांनी मालेगावमध्ये कामकाजही केले.
अशाच प्रकारे लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमजीवी आणि निर्वासितांचे स्थलांतर सुरू झाले आणि त्यांना रोखून निवारागृहात ठेवण्याचे काम सुरू होत असतानाच उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी मोठी जबाबदारी निभावली. पर्यटन विभागात ते प्रतिनियुक्तीवर गेले होते. तेथून ते मूळ सेवेत १६ नोव्हेंबर रोजी आले. त्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचदरम्यान, लॉकडाउन झाल्यानंतर मुंडावरे यांनी स्वत:हून जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेतली आणि काही जबाबदारी असेल तर ती स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाºयांनी त्यांना श्रमिकांचे निवाराशेड आणि अन्य कामात समन्वय साधण्याची जबाबदारी दिली. त्यांनी ती स्वीकारली. निर्वासितांना विविध सुविधा एनजीओच्या माध्यमातून देत असतानाच केंद्र शासनाकडे प्रायोगिक तत्त्वावर नाशिकमधून श्रमिकांना त्यांच्या गावी पाठविण्याचे ठरवले. त्यावेळपासून आत्तापर्यंत रेल्वेतून ९ हजार ८०० श्रमिकांना त्यांच्या मूळ राज्यांत पाठविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना वेतन प्रलंबित आहे.
मात्र अशा स्थितीतदेखील त्यांनी स्वेच्छेने हे काम केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने जबाबदारी टाळणाºया अनेक शासकीय कर्मचाºयांना ही दोन उदाहरणे प्रेरणा देणारी ठरली आहेत.
--------------------
कोरोना काळात शासकीय यंत्रणेला मदतीची गरज होती. मी मालेगावमध्ये काम केलेले असल्याने संपूर्ण शहराची मला माहिती आहे, त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी मदत केली. आज मालेगाव येथील बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे, याबद्दल समाधान वाटते.
- जीवन सोनवणे, माजी आयुक्त,
मालेगाव महापालिका
------------------------
सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड होती. यापूर्वी २००५ मध्ये मुंबईतील महापूर आणि त्यानंतर केदारनाथ येथील प्रलयानंतर तेथे पुनर्वसनाचे काम केले आहे. यंदा कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती बघता घरी स्वस्थ बसवत नव्हते. श्रमिकांची सर्व व्यवस्था करताना त्यांना मूळ गावी सुरक्षितरीत्या पाठविले, याचा आनंद वाटतो.
- नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी, नाशिक