खुने यांच्या स्वेच्छानिवृत्तीस मंजुरी
By admin | Published: February 7, 2017 01:06 AM2017-02-07T01:06:38+5:302017-02-07T01:07:06+5:30
अखेरच्या महासभेत मान्यता : ६५ नगरसेवकांची हजेरी
नाशिक : महापालिकेचे शहर अभियंता सुनील खुने यांनी दिलेला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करीत महासभेने त्यांचा मार्ग मोकळा केला आहे. खुने यांच्या या अर्जाला एकाच नगरसेवकाने विरोध केला. विशेष म्हणजे महापालिकेच्या ९२ पैकी ६५ नगरसेवकांनी या सभेला हजेरी लावली आणि खुने यांच्या अर्ज मंजुरीला मदत केली. कोणत्याही आडकाठीशिवाय स्वेच्छानिवृत्त होणारे खुने हे पहिले अभियंता ठरले आहेत. महापालिकेची मासिक महासभा सोमवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या उपस्थितीत पार पडली. महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे. अशावेळी महासभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यातच निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतर करणाऱ्या विविध तीस नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. अशावेळी औपचारिकता ठरलेल्या या महासभेत किती नगरसेवक हजेरी लावतील, याविषयी शंका होती. प्रत्यक्षात खुने यांच्यावरील स्नेहापोटीच बहुधा आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी निवडणूक व्यस्ततेतून वेळ काढून महासभेला हजेरी लावली. एरव्ही अन्य कामात व्यस्त असणाऱ्या आमदारव्दयी पालिका निवडणुकीच्या धामधुमीतून या सभेला उपस्थित राहिल्याने तो चर्चेचा विषय ठरला. महासभेत सदरचा विषय पटलावर आल्यानंतर दिनकर पाटील यांनी खुने यांच्या स्वेच्छानिवृत्तीस विरोध केला. सुनील खुने यांच्या कारकिर्दीत पावसाळी गटार योजना राबविण्यात आली. त्यात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच त्यासंदर्भात चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. ती प्रलंबित आहे, याशिवाय घरकुल योजनेत गैरव्यवहाराचा त्यांच्यावर ठपका असून, अशावेळी महासभेतील चर्चेशिवाय विषय मंजूर करू नये, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. तसेच हा विषय मंजूर झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला. तसे पत्र नगरसचिवांकडे देऊन त्याची नोंद इतिवृत्तात करण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)