मनोविश्वातील गरगर दर्शवणारा ‘भोवरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:37 AM2019-11-21T00:37:05+5:302019-11-21T00:37:29+5:30
माणसाच्या भूतकाळातील घटना त्याच्या वर्तमानासह भविष्यावर परिणाम करतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या तसेच त्याच्या निकटच्या व्यक्तींच्या वर्तमानातही प्रश्नांचे भोवरे निर्माण करते. तसेच संबंधितांच्या भविष्यावर सावट पाडणाऱ्या भावविश्वाचे दर्शन ‘भोवरा’ या नाटकातून घडले.
नाशिक : माणसाच्या भूतकाळातील घटना त्याच्या वर्तमानासह भविष्यावर परिणाम करतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या तसेच त्याच्या निकटच्या व्यक्तींच्या वर्तमानातही प्रश्नांचे भोवरे निर्माण करते. तसेच संबंधितांच्या भविष्यावर सावट पाडणाऱ्या भावविश्वाचे दर्शन ‘भोवरा’ या नाटकातून घडले.
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत बुधवारी नाशिकरोडच्या मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या वतीने ‘भोवरा’ हे नाटक सादर करण्यात आले. विशिष्ट अटी-शर्ती घालून लग्न केलेली लहान बहीण तिच्या नवºयाच्या इच्छेविरुद्ध मोठ्या बहिणीला घरात आणून ठेवते. खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात राहून आलेली मोठी बहीण जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेली असून, ती मनोरुग्ण आहे. मोठ्या बहिणीचे वास्तव उलगडून घेण्यासाठी एका मानसशास्त्र तज्ज्ञ प्राध्यापकाची लहान बहीण मदत घेते. या सर्व घटनांमध्ये नात्यांतील गुंता आणि द्वंद्व उत्कृष्टपणे मांडण्यात आले आहे. अखेरच्या टप्प्यात मिळालेले उत्तरदेखील प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांचे काहूर निर्माण करण्याचा परिणाम साधणारे ठरते. दिग्दर्शक धनंजय वाबळे यांनी मूळ संहितेला अत्यंत प्रभावीपणे आणि प्रवाहीपणे उलगडत नेले. चंद्रकांत जाडकर यांचे नेपथ्य, रोहित सरोदे यांचे संगीत संयोजन, डॉ. राजश्री पाठक यांची वेशभूषा नाटकाला अधिक आशय प्रदान करणारी होती. डॉ. प्राजक्ता भांबारे, डॉ. माधवी गोरे-मुठाळ, डॉ. नीलेश जेजुरकर, मोहन आमेसर यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला.
आजचे नाटक- जनकसुता
वेळ : सायंकाळी ७ वाजता