ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:36 AM2019-09-28T00:36:20+5:302019-09-28T00:36:43+5:30
विधानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे.
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता स्थळ : ज्येष्ठ नागरिक कट्टा
नाशिक : विधानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. उमेदवारांसाठी हक्काचे मत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनामध्येही विभानसभेच्या निवडणुकांविषयी कुतूहल बघायला मिळत आहे. त्यामुळे मखलमलाबाद येथील ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावरही निवडणुकांविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून नवनवीन पायंडे वापरण्यात येतात, असे मत एका ज्येष्ठांनी व्यक्त केले. त्यावर एकाने लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक आली की येऊन पाया पडतात व मत मागतात, मात्र परत पाच वर्षे तोंड दाखवत नसल्याचे सांगितले. तसेच एकाने माझा या ईव्हीएम मशीनवर विश्वासच नसून मतदानाच्या वेळी मशीनवर नुसते बटण दाबतो मात्र ते मत कोणाला जाते हे कळत नाही त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान व्हायला पाहिजे, असे सांगितले. त्यात एकाने उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुंडप्रवृत्तीच्या लोकांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी न देण्याचे मत मांडले. अशात एका १०० वर्ष वयाच्या ज्येष्ठाने सरकार कुणाचे येवो मात्र सर्वसामान्यांना कुठलाही फायदा होत नाही तसेच उमेदवारपण त्यांचे पोट भरण्यातच समाधान मानतात. यावर सर्वांनी याला दुजोरा देत हे अगदी बरोबर असल्याचे सांगितले. यावेळी जवळपास सर्वच ज्येष्ठांनी मतदानप्रकियेत बदल करून बॅलेट पेपरवरच मतदान घ्यायला हवे, असे मत मांडले.
(या चर्चेत रामचंद्र पिंगळे, नारायण काकड, दत्तात्रय काकड, प्रताप काकड, नितीन काकड, संतोष काकड, दिनकर काकड, निवृत्ती पिंगळे आदींनी सहभाग घेतला.)
लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारने बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. मात्र विरोधी पक्षांसह अनेक नागरिकांनीही याबद्दल संशय व्यक्त केला. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांनीही ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत पुन्हा पूर्वीसारखे मतदान व्हायला हवे, असे मत मांडले. तसेच पूर्वी निवडणुकांसाठी एवढा पैसा खर्च केला जात नव्हता.मात्र आताचे राजकारणी पैशांच्या जोरावरच निवडून येत असून, त्यामुळे त्यांना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाणीव उरत नाही, अशा भावनादेखील व्यक्त करण्यात आल्या.