शंभर ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्या जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:37 AM2020-12-04T04:37:39+5:302020-12-04T04:37:39+5:30
नांदूरशिंगोटे : सर्वाधिक चुरशीने लढल्या जाणाऱ्या आणि गावगाड्याशी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. निवडणूक आयोगाने ...
नांदूरशिंगोटे : सर्वाधिक चुरशीने लढल्या जाणाऱ्या आणि गावगाड्याशी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. निवडणूक आयोगाने सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार दि. १ डिसेंबरला प्रारूप मतदार याद्या तालुक्यातील गावोगावी प्रसिद्ध झाल्या आहेत.
गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या नाहीत. फेब्रुवारीमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला होता, मात्र कोरोनामुळे तोही रद्द करण्यात आला. त्यामुळे आता जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ते १० डिसेंबरदरम्यान मतदार यादीवर हरकती दुरुस्त होऊन १० डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्या यादीवरच आगामी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. दि. २५ सप्टेंबर २०२० रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेने मंगळवारी (दि.१) ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली. या यादीवर मतदारांना १ ते ७ डिसेंबर या सात दिवसांच्या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत.
दरम्यान, सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला असून, ही यादी दि. १५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीशी तिचा काहीएक संबंध नसल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी स्पष्ट केले आहे. याउलट ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतदारयादी मात्र १० डिसेंबर रोजी अंतिम केली जाणार आहे. १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर मतदारांच्या हरकती असल्यास त्या लेखी स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालय किंवा तहसील कार्यालय सिन्नर येथे मतदारांना सादर करता येणार असल्याचे तहसीलदार कोताडे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.