राजकीय पक्ष कार्यालयात पोहोचणार मतदार याद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:25 AM2019-07-28T00:25:02+5:302019-07-28T00:25:22+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याने तयारीत आघाडी घेतली असून, मतदानप्रक्रियेसाठी लागणारे कागद आणि मशीन्सच्या बॅटऱ्या बॅँगलोर येथून दाखल झाल्या आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये मतदारयाद्या पोहचविण्याचे कामदेखील सुरू झाले आहे.
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याने तयारीत आघाडी घेतली असून, मतदानप्रक्रियेसाठी लागणारे कागद आणि मशीन्सच्या बॅटऱ्या बॅँगलोर येथून दाखल झाल्या आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये मतदारयाद्या पोहचविण्याचे कामदेखील सुरू झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आलेल्या नियोजनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामाला चांगलीच गती आली आहे. मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून, सर्वसामान्य नागरिक मतदानाच्या कामात गुंतल्याचे दिसते. विद्यार्थ्यांचादेखील सहभाग वाढल्यामुळे एकूणच जिल्ह्यातील निवडणूक तयारीच्या कामाला कमालीचा वेग आल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच जिल्हा निवडणूक शाखेने राज्य निवडणूक आयोगाकडे संभाव्य यंत्रांची मागणी नोंदविली असून त्यानुसार बॅँगलोर येथून काही साहित्य दाखलदेखील झाले असून, लवकरच अन्य मशीन्स आणि साहित्यदेखील दाखल होणार आहे.
निवडणूक शाखेने आयोगाकडे यापूर्वीच दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघात सुमारे ४४ लाख इतकी मतदारांची संख्या असून, निवडणूक प्रकिया सुरळित पार पाडण्यासाठी निवडणूक शाखेने विशेष खबरदारी घेतली आहे. येत्या १५ सप्टेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने निवडणूक शाखेकडून निवडणूक प्रक्रि या सुरळित पार पाडण्यासाठी तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर १९ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात मतदारयादी शुद्धीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात आलेली आहे.
पुणे येथून बीईएलचे २८० बीयू युनिट नाशिकसाठी प्राप्त होणार आहेत, तर बॅँगलोरवरून २५९० कंट्रोल युनिट आणि २७८० व्हीव्हीपॅट मशीन्स उपलब्ध होणार आहे. असे असले तरी मतदान यंत्राच्या बॅटºया आणि पेपर्स आदी साहित्य बॅँगलोरवरून दाखल होणार आहे. साधारणत: आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही यंत्रे निवडणूक शाखेला प्राप्त होतील. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उपयोगात आणलेली ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन विधानसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार नसल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.
राजकीय पक्षांना याद्या रवाना
जिल्हा निवडणूक शाखेने परिपूर्ण केलेल्या प्रारूप मतदारयाद्या राजकीय पक्षांच्या कार्यालयापर्यंत पोहचविण्याची मोहीम राबविली. शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयात प्रत्यक्षात जाऊन निवडणुकीशी संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यलयांमध्ये मतदारयाद्यांचे पॅकिंग रवाना केले.
मतदारांची संख्या व पंधरा मतदारसंघांतील मतदान केंद्रे यांची संख्या लक्षात घेता २२ हजार निवडणूक यंत्राची आवश्यकता आहे. त्यामध्ये दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट मशीन व सहा हजार कंट्रोल युनिट यंत्राची आवश्यकता आहे. ही मागणी निवडणूक शाखेने आयोगाकडे केली आहे.