मतदार नोंदणी अर्जाच्या कागदी पिशव्या बाजारात
By श्याम बागुल | Published: September 26, 2018 01:03 AM2018-09-26T01:03:42+5:302018-09-26T01:04:53+5:30
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती व नव मतदारांच्या नोंदणीसाठी कोरे अर्ज वाटप करून नोंदणी करून घेत असतानाच आता मतदार नोंदणी अर्जांच्या कागदी पिशव्या तयार करून त्या बाजारातील वस्तूंच्या विक्रीसाठी वापरात आणून आयोगाने प्रचार व प्रसाराचे नवीन तंत्र विकसित केले आहे.
नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती व नव मतदारांच्या नोंदणीसाठी कोरे अर्ज वाटप करून नोंदणी करून घेत असतानाच आता मतदार नोंदणी अर्जांच्या कागदी पिशव्या तयार करून त्या बाजारातील वस्तूंच्या विक्रीसाठी वापरात आणून आयोगाने प्रचार व प्रसाराचे नवीन तंत्र विकसित केले आहे. नाशिकच्या बाजारपेठेत मतदार नोंदणीच्या कोऱ्या अर्जांची रद्दीत विक्री करण्यात येऊन त्यातून कागदी पिशव्या तयार करणाºया लहान-मोठ्या व्यावसायिकांना त्यामुळे आर्थिक हातभार लागला आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सक्तीची प्लॅस्टिकवर बंदी करण्यात आली असून, प्लॅस्टिक ऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी शासनस्तरावरूनच मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार केला जात आहे. त्याला निवडणूक आयोगानेही हातभार लावला की काय अशी शंका या निमित्ताने घेतली जात असून, कागदी पिशव्या तयार करण्यासाठी भासणारी कागदाची टंचाई मतदार नाव नोंदणीच्या कोºया अर्जाने दूर करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून देशपातळीवर निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार पुनरीक्षण कार्यक्रम प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय राबविला जात आहे. त्यासाठी मतदार केंद्रनिहाय निवडणूक कार्यालये, बीएलओंकडे नवीन मतदार नोंदणीचे अर्ज नागरिकांना वाटप करण्यासाठी देण्यात आले आहेत. या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे यासाठी गावोगावी प्रचार रथ फिरवून प्रचार व प्रसारही केला जात असून, त्या माध्यमातून मतदार नोंदणी मोहीम जोरात सुरू असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र हेच मतदार नोंदणीचे अर्ज थेट रद्दीत विक्री केले जात असल्याचे आढळून आले आहे.
मतदार नोंदणी अर्जाची रद्दी विकत घेऊन शहरात कागदी पिशव्या तयार करणाºया घरगुती व्यावसायिकांकडून या अर्जांच्या कागदी पिशव्या तयार करण्यात आल्या असून, सध्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून या कागदी पिशव्यांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, लहान-मोठ्या व्यावसायिकांकडे मतदार नाव नोंदणी अर्जाच्या कागदी पिशव्या दिसू लागल्या आहेत. या अर्जाची खरोखर कोणी रद्दीत विक्री केली की आयोगाच्या सूचनेवरून मतदारांच्या घराघरांपर्यंत प्रचार व प्रसार होण्यासाठी कागदी पिशव्यांच्या माध्यमातून पोहोचण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही.