मतदार यादी प्रसिद्ध; ३६६ हरकती नामंजूर
By admin | Published: January 22, 2017 12:10 AM2017-01-22T00:10:24+5:302017-01-22T00:10:45+5:30
मनपा निवडणूक : स्थलांतरित मतदारांचा घोळ
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी मनपाच्या संकेतस्थळासह सहाही विभागीय कार्यालयात शनिवारी सायंकाळी उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. मतदार यादीसंबंधी प्राप्त ६८४ पैकी ३१८ हरकतींवर कार्यवाही झाली असून, तब्बल ३६६ हरकती फेटाळून लावण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने, पत्ताबदलासंबंधी स्थलांतरित मतदारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याने मतदार यादीतील घोळ कायम राहणार आहे. महापालिकेने सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेली मतदार यादी ग्राह्य धरत प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली होती. सदर प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी दि. १२ जानेवारीला महापालिकेच्या संकेतस्थळासह सहाही विभागीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर दि. १२ ते १७ या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार, सहा दिवसांत महापालिकेकडे ६८४ हरकती दाखल झाल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून सदर हरकती निकाली काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.