महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरणासाठी चौदा हजार मतदार करणार २८ तारखेला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 08:35 PM2017-12-06T20:35:55+5:302017-12-06T20:51:29+5:30
मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्राध्यापकांच्या जागांसांठी एकुण २२५८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई विभागासाठी ५६३, पुणे विभागासाठी ६०९, औरंगाबाद विभागासाठी ३४१, नाश्कि विभागासाठी ३१२, नागपूर विभागासाठी २२७, अमरावती १४६ अशी मतदारांची नोंदणी झाली
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी होणा-या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून या निवडणुकीसाठी १४ हजार ४८९ मतदार नोंदणी झाली आहे. विद्यापीठ नियमानुसार अधिसभा, विद्यापरिषद, अभ्यासमंडळासाठी निवडणूक घेतली जाते. या निवडणुकीसाठी विद्यापीठाने अंतिम मतदारयादी जाहिर केली आहे.सदर यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिसभेसाठी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्राध्यापकांच्या जागांसांठी एकुण २२५८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई विभागासाठी ५६३, पुणे विभागासाठी ६०९, औरंगाबाद विभागासाठी ३४१, नाश्कि विभागासाठी ३१२, नागपूर विभागासाठी २२७, अमरावती १४६ अशी मतदारांची नोंदणी झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेतील एक याप्रमाणे पाच शिक्षकांकरीता निवडणूक होणार आहे. यासाठी एकुण ९७५९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. वैद्यकीय विद्याशाखेसाठी ४१३१,दंत विद्याशाखेसाठी १६९७,आयुर्वेद विद्याशाखेसाठी १७५२, व युनानीसाठी १८१ असे एकुण १९३३, होमिओपॅथीसाठी ८८९ तर तत्सम विद्याशाखेसाठी ११०९ मतदारांची नोंद झाली आहे.
विद्यापीठाच्या विद्यापरिषदेसाठी वैद्यकीय, दंत,आयुर्वेद,होमिओपॅथी, आणि तत्सम विद्याशाखेतील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच प्राचर्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी २०० मतदार आहेत. वैद्यकीय शाखेसाठी ३६, दंत विद्याशाखेसाठी २५,आयुर्वेद व युनानीसाठी ४६, होमिओपॅथीसाठी ४० तर तत्सम विद्याशाखेसाठी ५२ मतदारांची नोंद झाली आहे.
प्रत्येक विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासमंडळामध्ये एकत्रित सहा विभागप्रमुख असतील यामध्ये एकुण १८ विविध अभ्यासमंडळाकरीता सदस्यांची निवडणूक घेता येईल. यात आधुनिक वैद्यक शखेमध्ये ६८५,दंत विद्याशाखेसाठी २३१, आयुर्वेद विद्याशाखामध्ये ६६५, युनानी ७७३, होमिओपॅथी ५०८, नर्सिंगसाठी ६७, आॅक्युपेशनल थेरपीसाठी ४२, फिजिओथेरपीसाठी ३७ असे एकुण २२७२ मतदार नोंदविले गेले आहेत.
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी येत्या २८ रोजी राज्यातील विविध केंद्रांवर मतदान होणार असून ३० रोजी विद्यापीठ मुख्यालयात मतमोजणी होणार असल्याचे विद्यपीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कालिदास चव्हाण यांनी कळविले आहे.