नाशिककरांनो, रविवारी पोहचा मतदान केंद्रांवर
By संदीप भालेराव | Published: September 8, 2022 02:25 PM2022-09-08T14:25:55+5:302022-09-08T14:27:07+5:30
मतदारयादी अधिकाधिक शुद्ध करण्याबरोबरच यादीतील दुबारनावे शोधून काढण्यासाठी मतदारयादीला आधारकार्ड जोडणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
नाशिक: मतदारयादी अधिकाधिक शुद्ध करण्याबरोबरच यादीतील दुबारनावे शोधून काढण्यासाठी मतदारयादीला आधारकार्ड जोडणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवारी (दि.११) नाशिक जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर आधार जोडणी शिबीर होणार आहे. त्यामुळे मतदारांना अधिक धावाधाव करावी लागणार नसून आपापल्या मतदान केंद्रांवर पोहचून नोंदवणी करता येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्यासाठी रविवार दि. ११ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आपले आधारकार्ड व मतदार ओळखपत्र जोडणी करूण घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ४६८१ केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे. ‘व्हेाटर हेल्पलाईन ॲप’ द्वारे देखील मतदार ऑनलाईन स्वरूपात मतदार यादीला आधार जोडणी करू शकतात.
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार ४५ लाख ९१ हजार ९२४ मतदारांपैकी एकूण ५ लाख ८२ हजार ३४२ मतदारांनी आपले ओळखपत्र आधारकार्डशी जोडणी केलेले असून १२.६८ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. मतदारांनी या उपक्रमास जास्तीत जास्त सहभाग नोंदवून प्रतिसाद द्यावा, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी थविल यांनी कळविले आहे.