दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीसाठी ९ जानेवारीस मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 01:20 AM2019-12-10T01:20:27+5:302019-12-10T01:20:45+5:30
महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या सोमवारपासून (दि.९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे, तर दि. ९ जानेवारीस मतदान होणार आहे.
नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या सोमवारपासून (दि.९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे, तर दि. ९ जानेवारीस मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. विशेषत: महापालिकेत स्थायी समितीसह सर्वच समित्यांवर तौलनिक संख्याबळानुसार सदस्य नियुक्त केले जात असल्याने या दोन्ही जागा मिळविण्यासाठी सर्वच प्रमुखपक्षांची कसरत होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २६ ब मधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढविली होती, तर नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ ब मधील भाजप नगरसेवक सरोज आहिरे यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी राजीनामा दिला. यानंतर सरोज आहिरे या आमदार म्हणून निवडून आल्या असल्या तरी दातीर यांचा मात्र पराभव झाला होता.
या दोन्ही प्रभागांसाठी मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर आता या दोन्ही प्रभागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इच्छुकांची व्यूहरचना सुरू
प्रभाग क्रमांक २६ मधून निवडणूक लढविण्यासाठी मनसेकडून दिलीप दातीर, संगीता दातीर, माकपकडून तानाजी जायभावे, सचिव भोर, भाजपकडून कैलास आहिरे, निवृत्त इंगोळे, अशोक पवार, उखा चौधरी, राष्टÑवादीच्या वतीने मधुकर जाधव, डॉ. ज्योती सोनवणे यांच्यासह अन्य इच्छुक आहेत, तर प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्टÑवादीकडून वैशाली दाणी, जगदीश पवार, माधुरी ओहोळ, सुकदेव लोंढे, भाजपकडून रामदास सदाफुले, कॉँग्रेसकडून सारिका कीर, शिवसेनेकडून कुमार पगारे, अमोल आल्हाट यांच्यासह अन्य इच्छुक प्रयत्न करीत आहेत.
अधिसूचना दि. १६ रोजी जाहीर होणार, त्याच दिवशीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. दि. १६ ते २३ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.
४ दि. २४ रोजी छाननी, अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत दि. २६ रोजी दि. २७ रोजी निवडणूक चिन्हांचे वाटपा, तर दि.२७ रोजी उमेदवारांची अंतिम वैध यादी , दि.९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.