गाव-खेड्यात पोहोचल्या मतदान चिठ्ठ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:45 AM2019-10-17T01:45:22+5:302019-10-17T01:46:37+5:30
मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गावागावांतील मतदारांपर्यंत निवडणूक शाखेनेच मतदान स्लिपा वाटपाची मोहीम सुरू केली आहे. गावखेड्यातील तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्यात मतदानाविषयीची जागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भातील मोहीम अधिक पारपदर्शक आणि गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक : मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गावागावांतील मतदारांपर्यंत निवडणूक शाखेनेच मतदान स्लिपा वाटपाची मोहीम सुरू केली आहे. गावखेड्यातील तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्यात मतदानाविषयीची जागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भातील मोहीम अधिक पारपदर्शक आणि गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांकडून मतदारांना मतदान स्लिपांचे वाटप केले जाते. परंतु प्रत्येक मतदारालाच अशाप्रकारची सुविधा मिळते असे नाही. त्यामुळे गाव-खेडे तसेच अतिदुर्गम भागातील मतदारांनादेखील मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मतदान स्लिपांचे वाटप करण्यात येत आहे. सदर मोहिमेला सुरुवात झाली असून, मतदारांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच त्यांना मतदानाची माहिती दिली जात आहे. जुन्या मतदारांसह नवमतदारांनादेखील मतदान करण्याबाबतचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
या मोहिमेत मतदान स्लिपांबरोबरच मतदारांसाठी माहिती पुस्तिकादेखील दिली जात आहे. या पुस्तिकेमध्ये मतदारांना मतदान नोंदणीपासून ते मतदान करण्याच्या प्रक्रियेपर्यंत माहिती देण्यात आलेली आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यांचीदेखील माहिती छापील स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदान केंद्रामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची माहितीदेखील या पुस्तिकेतून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी निवडणूक शाखेकडून व्यापक प्रयत्न करण्यात आलेले आहे.
निवडणूक शाखेकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेतून ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा मुख्य उद्देशदेखील आहे. आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्थादेखील केली जाणार असून, त्याबाबतची माहितीदेखील मतदारांना दिली जात आहे. मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली असल्याने कुणीही कामावर जाऊ नये याबाबतची आठवणही करून दिली जात आहे. ग्रामीण भागात मतदानाची सर्व माहिती पुरविण्याच्या हेतूने आयोगाकडून मोहीम राबविली जात आहे.