नाशिक मनपा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:56 PM2020-01-08T18:56:11+5:302020-01-08T18:56:33+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक२६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व प्रभाग २२ मधील भाजपाच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोघा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : सातपूर येथील प्रभाग क्रमांक २६ व नाशिकरोडच्या प्रभाग २२ मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. ९ ) रोजी मतदान घेण्यात येणार असल्याने बुधवारी मतदान कर्मचारी मतदान यंत्रांसह पोलीस बंदोबस्तात आपापल्या बुथवर रवाना झाले आहेत. दुपारनंतर सर्व मतदान केंद्रे सज्ज झाली असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात होत्या.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक२६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व प्रभाग २२ मधील भाजपाच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोघा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या वतीने मधुकर जाधव तर मनसेचे दिलीप दातीर,भाजपाचे उमेदवार कैलास आहिरे,माकपाचे मोहन जाधव यांच्यासह अपक्ष एकनाथ सावळे,सुवर्णा कोठावदे, अशोक पवार हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान घेण्यात येत आहे. त्यासाठी ४२ बुथची व्यवस्था करण्यात आली असून, बुधवारी सकाळी मतदान कर्मचारी मतदान यंत्रांसह पोलीस बंदोबस्तात बुथवर रवाना करण्यात आले. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मतमोजणी करण्यात येणार असून त्यासाठी ७ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग २६ ची मतमोजणीची व्यवस्था महापालिकेच्या सातपूर येथील क्लब हाऊस येथे करण्यात आली आहे. मतदान आणि मतमोजणीच्या तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरविंद अंतुर्लीकर सहायक म्हणून विभागीय अधिकारी लक्ष्मण गायकवाड काम पहात आहेत.