जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:26 AM2018-05-28T01:26:54+5:302018-05-28T01:26:54+5:30
जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. २७) शांततेत मतदान झाले. सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.
नाशिक : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. २७) शांततेत मतदान झाले. सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.
सटाणा : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ६९.२० टक्के सरासरी मतदान झाले. मतदान केंद्रांवर मतदारांची सकाळपासुनच गर्दी केली होती. सकाळी ११ वाजे पर्यंत २८ टक्के मतदान झाले होते. दुपारी २ ते ३ वाजे पर्यंत मतदान केंद्रांवर उन्हामुळे शुकशुकाट होता. दुपारी ३ वाजेपासून पुन्हा मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. केरसाणे ६२.८२ टक्के, भाक्षी ७३.१९ टक्के, मुळाणे ६८.०८ टक्के, केळझर ७४.९० टक्के याप्रमाणे मतदान झाले.
कळवण : तालुक्यातील देसगाव, सरलेदिगर, खडकी, कोसवन, करंभेळ येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ८२.६० टक्के मतदान झाले. खडकी येथे सर्वाधिक ९१.५६ टक्के मतदान झाले. देसगाव येथे १५९० पैकी १२९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ८१.२६ टक्के मतदान केले. सरले दिगर येथे ७७.४८ टक्के मतदान झाले खडकी येथे ९१.५६ टक्के मतदान झाले. कोसवन येथे १३३१ मतदारांपैकी १०८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ८१.५२ टक्के मतदान केले. करंभेळ येथे ८४.९३ टक्के मतदान केले. देसगाव येथे थेट सरपंचपदासाठी चौरंगी लढत होत असून ६ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ३ जागांसाठी ८ उमेदवारांनी निवडणूक लढवली.
सरलेदिगर येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत असून ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. एका जागेसाठी दुरंगी लढत होत आहे.
खडकी येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत असून एक जागा बिनविरोध झाली आहे. ७ जागांसाठी १४ उमेदवारांनी निवडणूक लढवली. करंभेळ येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत असून ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. एका जागेसाठी दुरंगी लढत झाली. कोसवन येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत असून ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ५ जागांसाठी ९ उमेदवारांनी निवडणूक लढवली.
देवळ्यात तीन ग्रामपंचायतींसाठी मतदान
देवळा : तालुक्यातील मेशी, माळवाडी व फुलेमाळवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार मतदान झाले. मेशी ८३ टक्के, माळवाडी ८५.१५ टक्के तर फुलेमाळवाडी ८७.१२ टक्के, मतदान झाले. थेट सरपंचपदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत सरपंचपदासाठी मेशीत ३, माळवाडी ३ तर फुलेमाळवाडीत २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रा.पं. सदस्यांच्या काही जागांची निवड बिनविरोध झाल्यामुळे १७ सदस्यांसाठी ३४ उमेदवारांनी निवडणूक लढवली. सोमवार दि. २७ रोजी मतमोजणी होणार आहे. सिन्नर तालुक्यातील सोमठाण येथे २ जागासाठी तर दापुरला एका जागेसाठी शांततेत मतदान पार पडले.