मालेगाव तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 09:48 PM2021-01-15T21:48:55+5:302021-01-16T01:10:30+5:30
मालेगाव : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत व सुरळीत पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६.६८ टक्के मतदान झाले होते. साडेपाच वाजेच्या आत मतदान केंद्रात दाखल झालेल्या तालुक्यातील टेहरे, चंदनपुरी, रावळगाव, झोडगे, येसगाव खुर्द येथील मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती, तर बहुतांश गावांची मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात येथील तहसील कार्यालयाच्या स्ट्रँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. रूमबाहेर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तालुक्यातील टेहरे येथील मतदान केंद्र क्रमांक प्रभाग २ व ३ मध्ये मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी केंद्राची पाहणी केली व दोन्ही केंद्रांत प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली होती. तालुक्यातील टेहरे, चंदनपुरी, निमगाव येथील दोन गटांमधील किरकोळ वाद वगळता तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. तहसीलदार चंद्रजीत राजपूत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींचे ३१७ प्रभागातील ७५९ जागांसाठी निवडणूक रिंगणात उभे असलेल्या १ हजार ६८४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. कोरोनाची भीती दूर करीत मतदारांनी निर्भयपणे मतदान केले. तालुक्यातील येसगाव बु।। केंद्रावरील केंद्र क्रमांक ३ मधील मतदान यंत्राची बॅटरी बंद पडल्याने काही वेळ यंत्र बंद पडले होते. कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन त्या ठिकाणावरील मतदान यंत्र पूर्ववत सुरळीत केले.