नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; २१ उमेदवार रिंगणात
By दिनेश पाठक | Published: June 25, 2024 06:11 PM2024-06-25T18:11:46+5:302024-06-25T18:17:01+5:30
६९ हजार मतदान बजावणार हक्क; चौरंगी लढतीकडे लक्ष
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात बुधवारी (दि. २६) मतदान होत असून २१ उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढतीचे चित्र आहे. खास करून महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस पहावयास मिळाली. लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाशिक विभागातील ६९ हजार३१८ मतदार आपला हक्क बजावतील.
निवडणूकीत शिंदेसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किशोर दराडे, उद्धवसेनेचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार तसेच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढतीचे चित्र आहे.
या निवडणूकीसाठी ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे सेनेचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असलेल्या अहमदनगर येथील किशोर दराडे यांनी देखील अर्ज दाखल केल्यानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रिंगणात असलेल्या अॅड. महेंद्र भावसार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने युतीतील बेबनाव दिसून आला. नाशिकमध्ये सर्वाधिक सुमारे २५ हजार मतदार आहेत. दाेघा पक्षाच्या नेत्यांनी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठका तसेच शिक्षकांचे मेळावे देखील घेतले होते. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची निवडणूक असल्याचे लक्षात घेऊन नाशिक तसेच जळगावचा दाैरा केला होता. मतदानासाठी शिक्षकांना पैसे दिले जात असल्याचा आरोपही महायुतीवर झाला. प्रकरण उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मिडियार व्हायरल केल्यानंतर बरेच वादळ उठले होते.
रिंगणातील उमेदवार असे
किशोर दराडे (शिंदेसेना), अॅड. संदीप गुळवे (उद्भवसेना), अॅड. महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस), भागवत गायकवाड (समता पार्टी), अनिल तेजा, अमृतराव शिंदे, इरफान नादिर, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागरदादा कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरुले, सचिन अगडे, दिलीप डोंगरे, आर. डी. निकम, डॉ. छगन पानसरे, रणजीत बोठे, महेश शिरुडे, रतन
चावला, संतोष गुळवे (अपक्ष).
जिल्हानिहाय मतदार
नाशिक २५३०२
धुळे ८१५९
जळगाव १३,१२२
नंदुरबार ५३९३
अहमदनगर १७,३९२
एकुण ६९,३१८