विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी केंद्रावर रवाना
By संकेत शुक्ला | Published: June 25, 2024 05:54 PM2024-06-25T17:54:47+5:302024-06-25T17:55:02+5:30
जिल्ह्यातील २९ केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे.
नाशिक : शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या (दि.२६) मतदान होत असून कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.
नाशिक विभागात २१ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये मुख्य लढत विद्यमान आमदार शिंदे सेनेचे उमेदवार किशोर दराडे, उद्धव सेनेचे संदीप गुळवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार या चौघांमध्ये लढत होणार आहे. जिल्ह्यातील २९ केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे.
नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील एकूण ६९ हजार ३६८ शिक्षक मतदान करू शकणार आहेत. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार असून उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रमांक नोंदवून शिक्षकांना मतदान करता येणार आहे. मतदानासाठीचे बॅलेट पेपर, पाच टक्के अतिरिक्त बॅलेट पेपर, पेन, शाई यांसारखी आवश्यक सामग्री घेऊन कर्मचारी मंगळवारी सकाळी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदारसंघात सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिकमध्ये आहेत. जिल्ह्यातील २९ केंद्रांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. शहरातील दहा मतदान केंद्रांसह सटाणा, येवला, निफाडसह मालेगाव ग्रामीणमध्ये प्रत्येकी दोन तर देवळा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर इगतपुरी, सिन्नरसह मालेगाव शहरात प्रत्येकी एक केंद्र आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचाऱ्यांची नियुक्त केली आहे. यामध्ये एक केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षकासह शिपायाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १७४ कर्मचाऱ्यांची मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती केली असून याशिवाय प्रत्येक केंद्रावर दोन पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला असणार आहेत.