‘पश्चिम’मध्ये मतदान शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:26 AM2019-10-22T01:26:34+5:302019-10-22T01:27:45+5:30

Maharashtra Assembly Election 2019पावसाची रिपरिप व ढगाळ हवामानामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात सकाळच्या सुमाराला काहीसा अल्पप्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले.

 Voting in the 'West' is peaceful | ‘पश्चिम’मध्ये मतदान शांततेत

‘पश्चिम’मध्ये मतदान शांततेत

Next

सिडको/सातपूर : पावसाची रिपरिप व ढगाळ हवामानामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात सकाळच्या सुमाराला काहीसा अल्पप्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. सायंकाळी ५ वाजेनंतर काही मतदान केंद्रावरील मतदान पूर्ण झाले तर काही ठिकाणी ६ वाजेनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पश्चिम मतदारसंघात सुमारे ५४ टक्के शांततेत मतदान झाले.
नाशिक पश्चिम मतदारसंघातील ३६५ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी मतदान अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींसमक्ष मतदानयंत्र सुरू करण्यात येऊन मॉकपोल घेण्यात आले. त्यात प्रत्येक प्रतिनिधींना मतदानयंत्र तसेच व्हीव्हीपॅट सुरू असल्याची खात्री करून घेण्याची संधी देण्यात आली व मॉकपोलमध्ये झालेल्या मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली असली तरी, बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारच नसल्याने यंत्रणेला बसावे लागले. दरम्यान, उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीच्या दोन तासांत फक्त ३ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानंतर दहा वाजेपासून मतदार घराबाहेर पडले. ११ वाजेपर्यंत ११ टक्के, तर दुपारी १ वाजेपर्यंत २३ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मात्र सिडकोतील रायगड चौक, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, विखेपाटील शाळा, गणेश चौक, विद्यानिकेतन, मॉर्डन शाळा, ग्रामोद्य, मोरवाडी परिसरासह उत्तमनगर येथील मतदान केंद्रांवर मतदानासांठी रांगा लागल्या. यंदा दुसºया मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यास आयोगाने मज्जाव केल्याने मिनाताई ठाकरे शाळेसह शारदा विद्यालय, चुंचाळे, जनता विद्यालय, उत्तमनगर या मतदान केंद्रांवर नव्याने तात्पुरते पत्र्याचे मतदान केंद्र उभारण्यात आले. दुपारी ४ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांचा ओघ वाढला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४८.२९ टक्के मतदान झाले.
मतदानासाठी निवडणूक आयोगाने मतदानासाठी पगारी सुटी जाहीर केल्याने शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. तर सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांनी कामगार, अधिकारी आणि कर्मचाºयांना मतदानासाठी पगारी सुटी दिली. काही कारखान्यांनी मतदानासाठी कर्मचाºयांना सवलतीचा वेळ दिल्याने त्यांना मतदान करता आले.
प्रबुद्धनगर, महादेववाडीत गर्दी
सातपूर विभागात झोपडपट्टी भाग मोठ्या प्रमाणात असल्याने या भागातील मतदारांनी उशिरापर्यंत मतदान केले. सातपूरगावातील महादेववाडी येथील मतदान केंद्र आणि सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील बूथ क्रमांक १३७, १३८,१३९ आणि १४१ या बुथवर मतदानाची वेळ संपून गेल्यानंतरही रात्री साडे सात वाजेपर्यंत मतदान सुरु होते. या बुथवर प्रबुद्धनगर आणि महादेववाडीतील मतदारांचा समावेश होता. या मतदारांनी दुपारी ३ वाजेनंतर एकच गर्दी केल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यंत्र बंद पडल्याने मतदान खोळंबले
सिडकोतील विखे पाटील शाळेतील बुथ क्रमांक ३१६ व ३१७ वर सकाळीच मतदान केंद्रावर मशीन बंद पडले होते. मात्र काही वेळातच मशीन दुरुस्त करण्यात आले. त्याचबरोबर गणेश चौकातील राधाकृष्णन शाळेतील बुथ क्रमांक २४२ मधील मशीन दुपारी सुमारे पाऊण तास बंद पडले होते. याठिकाणी अखेरीस दुसरे मशिन लावण्यात आले. त्यामुळे मतदारांना बराच काळ वाट पहावी लागत होती.

Web Title:  Voting in the 'West' is peaceful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.