स्वर आराधनेमुळे आयुष्य होते आनंदी
By admin | Published: December 20, 2015 12:10 AM2015-12-20T00:10:18+5:302015-12-20T00:11:53+5:30
दसककर : सावानाच्या ‘अमृतस्वर’ स्पर्धेचे उद्घाटन
नाशिक : स्वर व स्वराकार ही ईश्वराने मानवाला दिलेली अलौकिक देणगी असून, तिची श्रद्धापूर्वक आराधना केल्यास आयुष्य आनंदी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक पं. प्रभाकर दसककर यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन विभागाच्या वतीने मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित ‘अमृतस्वर’ गायन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आज पहिल्या दिवशी स्पर्धेत पाचवी ते सहावी गटातील १८० विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी ‘उठी श्रीरामा’, ‘चाफा बोलेना’, ‘देहाची तिजोरी’, ‘उठी उठी गोपाला’, ‘घागर घेऊन’, ‘विठू माउली तू’ यांसारखी गीते सादर करीत चिमुकल्या गायकांनी परीक्षकांसह उपस्थितांची दाद घेतली.
मुलांमधील उपजत स्वरांचा शोध घेऊन त्यांच्या गायनकलेला दिशा मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा पाचवी ते सहावी आणि सातवी ते आठवी अशा दोन गटांत होत आहे.
सावानाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, परीक्षक शुभांजली पाडेकर, धनंजय धुमाळ, समन्वयक नवीन तांबट, श्याम पाडेकर उपस्थित होते. बालभवन प्रमुख गिरीश नातू यांनी आभार मानले. कार्यकारिणी सदस्य देवदत्त जोशी, स्वानंद बेदरकर , समिती सदस्य नितीन वारे, हेमा नातू, डॉ. आशा कुलकर्णी, प्रकाश वैद्य उपस्थित होते.