स्त्री समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता कुलगुरू ई. वायुनंदन : ‘महिलांची सुरक्षितता’ विषयावर परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:46 AM2018-03-09T00:46:51+5:302018-03-09T00:46:51+5:30
नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.
नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्ताने विद्यापीठात सावित्रीबाई फुले अध्यासनातर्फे ‘महिलांची सुरक्षितता’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. कविता साळुंके आणि सावित्रीबाई फुले अध्यासनाचे प्रमुख प्रवीण घोडेस्वार होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या या परिसंवादात बोलताना कुलगुरू म्हणाले, आज स्त्रीने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहे. ती स्वत:चे घर सांभाळून आपले कर्तव्य पार पाडत असते. तिने अनेक सकारात्मक बदल आपल्या जीवनात स्वीकारले आहेत. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ तिची कमाई किंवा तिचा आधुनिक पोशाख, जीवनशैली नाही, तर तो बदल प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनातून झाला पाहिजे, असे कुलगुरू म्हणाले. एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून स्वीकारावे एवढीच महिलेची साधी अपेक्षा असते. पुरुषांनीही स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणला तर ते शक्य होईल, असा सूर या परिसंवादातून उमटला. प्रारंभी सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक प्रवीण घोडेस्वार यांनी प्रास्ताविक केले. संगीता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिसंवादात विद्यापीठात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाºया सिंधूबाई जाधव म्हणाल्या, गेल्या २२ वर्षांपासून मी या विद्यापीठात काम करतेय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगी धुणीभांडी, पोळीभाजीचे काम करून दिवस काढले. मात्र, पतीच्या अकाली निधनानंतर विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाºयांनी सहानुभूती दाखवून मोलाची मदत केल्याने कुटुंबाला मोठी मदत झाली. कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी गेल्या काही महिन्यांत चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना पगारवाढीबरोबरच कपडे, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा दिल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात वावरतंय, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. आमच्यासाठी रोजचाच दिवस महिला दिनासारखा असल्याचेही त्या म्हणाल्या.