वडाळा-डीजीपीनगर रस्ता धोक्याचा ; दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक
By अझहर शेख | Published: November 25, 2018 11:06 PM2018-11-25T23:06:19+5:302018-11-26T00:30:16+5:30
आॅन दी स्पॉट नाशिक : वडाळा-डीजीपीनगर क्रमांक-१ला जोडणाऱ्या कॅनॉल रोडवरील पेट्रोलपंपापुढे असलेल्या चौफुलीलगत दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक आहे. तसेच या दुभाजकाचा ...
आॅन दी स्पॉट
नाशिक : वडाळा-डीजीपीनगर क्रमांक-१ला जोडणाऱ्या कॅनॉल रोडवरील पेट्रोलपंपापुढे असलेल्या चौफुलीलगत दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक आहे. तसेच या दुभाजकाचा रंग पुसट झाला आहे. दुभाजकाला रेडियम, रिफ्लेक्टर लावण्यात न आल्याने रात्रीच्या वेळी वाहने या दुभाजकावर आदळण्याच्या घटना वाढल्या आहेत. या रस्त्यावर अपघात प्रवण क्षेत्र अधिक अन् उपाययोजना कमी अशी स्थिती बघावयास मिळते.
नाशिक-पुणे-मुंबई महामार्गांना जोडणाºया संत सावता माळी कॅनॉल रस्ता डीजीपीनगर क्रमांक-१, वडाळागाव, साईनाथनगरमार्गे मुंबई महामार्गाला इंदिरानगर बोगद्याजवळ जोडतो. या रस्त्याला अपघाती तीव्र वळणे, विविध अंतर्गत कॉलन्यांचे जोडरस्ते, शाळा, रुग्णालय, प्रार्थनास्थळे, चौफुल्या, टी-पॉइंट आहेत. यामुळे या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा, महापालिका व प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तरीत्या पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. मागील काही महिन्यांपासून या रस्त्यावरून वाहतूक करताना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. रस्त्याला असलेल्या तीव्र वळणांवर कुठल्याहीप्रकारचे सूचना फलक, रेडियम लावण्यात आलेले नाही. रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टे किंवा रिफ्लेक्टरदेखील बसविण्यात आलेले नाही. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अत्यंत मंद प्रकाश असतो. पथदीपांचा प्रकाश अपुरा असतो. तीव्र वळणांवर वाहने समोरासमोर येतात.
रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी पांढरे पट्टेदेखील मारण्यात आलेले नाही. रस्त्याच्या मध्यभागी पांढरा पट्टा अस्तित्वात राहिलेला नाही.
आयटी पार्कजवळील पूल धोकादायक
पांडुरंग चौकाजवळ तीव्र वळणावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण उखडले आहे. वडाळा चौफुलीवर टाकण्यात आलेल्या दुभाजकांवरही रिफ्लेक्टर, रेडियम बसविण्याची गरज आहे. तसेच आयटी पार्कजवळील नाल्यावरील पूल रात्रीच्या वेळी वाहनाचालकांच्या लक्षात येत नाही. तेथेही सूचना फलक रेडियमसह बसविणे गरजेचे आहे. पुलाजवळ रस्त्याला इंदिरानगरच्या दिशेने ये-जा करताना तीव्र वळण आहे. येथे प्रकाशाची व्यवस्था महापालिकेने करण्याची मागणी होत आहे. पथदीप बंद असल्यामुळे पुलावर अंधार असतो.
पंधरवड्यात एक अपघात
श्रीश्री रविशंकर शंभरफुटी मार्ग सावता माळी पाट रस्त्याला जॉगिंग ट्रॅकजवळ मिळतो. या ठिकाणी चौफुली तयार झाली आहे. दुभाजक टाकून चौफुलीवरील वाहतूक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे या चौफुलीवर वाहने समोरासमोर येण्याचे प्रमाण कमी झाले आहे; मात्र रात्रीच्या वेळी या चौफुलीवर अंधार पसरलेला असतो. चौफुलीपासून पुढे विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंत रस्त्यावर अंधार असल्यामुळे वाहनचालकांना अंदाज बांधणे अवघड होते.
जय मल्हार कॉलनीच्या जोड रस्त्यापर्यंत दुभाजक पुढे वाढविण्यात आला आहे. यामुळे जय मल्हार कॉलनीचा जोड रस्ताही बंद झाला आहे. परिणामी या कॉलनीतून या मुख्य रस्त्यावर येणाºया वाहनांना दुभाजकाच्या शेवटपर्यंत जाऊन भर रस्त्यातून ‘यू-टर्न’ घेत डीजीपीनगरकडे यावे लागते. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण होते. या दुभाजकाची रुंदी कमी करुन दुभाजकाला रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे. पंधरवड्यात एक अपघात या दुभाजकामुळे अशा पद्धतीने होतो. रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असल्यामुळे अपघातसमयी मदतदेखील तत्काळ मिळणे कठीण होते.
एक रस्ता चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत
अपघात घडल्यावर वडाळागाव परिसरातील नागरिक मदतीसाठी धाव घेतात. त्यावेळी ते पहिला संपर्क इंदिरानगर पोलीस ठाण्याशी करतात; मात्र हद्दीचा वाद यावेळी अनुभवयास येतो. ‘अपघात कोठे झाला? तेथून पुढे आमची हद्द आहे, ते अपघाती स्थळ दुसºया पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, तुम्ही त्यांना कळावा’ अशी उत्तरे कानी पडतात. इंदिरानगर बोगद्यापासून वडाळागाव चौफु लीपर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा रस्ता आहे. तेथून पुढे मुंबई नाका पोलीस ठाण्याची हद्द अवघ्या काही मीटरपर्यंत येते. रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटपासून हा संपूर्ण रस्ता आंबेडकरनगरपर्यंत उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे नागरिकांचा अपघातसमयी गोंधळ उडतो. हद्दीचा वाद सोडवायचा असेल तर संबंधित पोलीस ठाणेप्रमुखांनी या रस्त्यावर ‘कोठून कुठपर्यंत हद्द आहे’ याचे सूचना फलक लावावे, अशी उपरोधिक मागणी नागरिकांनी केली आहे.