वडाळागावातील महापालिकेची उर्दू शाळा की कोंडवाडा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:55 PM2019-07-13T22:55:50+5:302019-07-14T00:36:05+5:30
वडाळागावात महापालिकेची उर्दू शाळा आहे की कोंडवाडा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या शाळेतील वर्गांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या या कारभाराबद्दल पालक वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इंदिरानगर : वडाळागावात महापालिकेची उर्दू शाळा आहे की कोंडवाडा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या शाळेतील वर्गांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या या कारभाराबद्दल पालक वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकरी व हातावर काम करणारी लोकवस्ती म्हणून वडाळागाव ओळखले जाते. सुमारे पंधरा हजार लोकवस्ती असलेल्या गावात सुमारे ५० टक्के हातावर काम करणारे नागरिक आहेत. गावात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असल्याने येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात दोन शाळा आहेत. यापैकी एक शाळा सारडा सर्कल येथे तर दुसरी शाळा वडाळागावात आहे.
सारडा सर्कल येथे गावातील विद्यार्थीवर्गास ये-जा करण्यास शहर वाहतूक बससेवा नसल्यामुळे आणि खासगी वाहनाने आर्थिक व मानसिक त्रास होत असल्याने पालकवर्ग पाठवत नाही. वडाळागावच्या उर्दू शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
यामध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात सुमारे ११०, इयत्ता नववीच्या वर्गात ९४, इयत्ता दहावीच्या वर्गात ७३ याप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे एका बेंचवर चार ते पाच विद्यार्थी दाटीवाटीने बसविण्यात येतात. विद्यार्थ्यांना वहीवर अभ्यास लिहिताना तारेवरची कसरत करावी लागते. नियमानुसार एका वर्गात ४५ ते ५० विद्यार्थी पाहिजे. परंतु ३० ते ३५ विद्यार्थी जास्त आहेत.
अशीच परिस्थिती प्राथमिक शाळेची आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्यासुद्धा अपुरी आहे. शासनाच्या वतीने घरोघरी जाऊन शिक्षणापासून कोणी विद्यार्थी वंचित राहता कामा नये यासाठी दखल घेतली जाते आणि दुसरीकडे महापालिकेच्या उर्दू शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नाही. महापालिकेच्या या कारभारबद्दल पालक वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.