गोठ्यांमधील मलमुत्र वडाळा रस्त्यावर; रहिवाशांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:38 PM2018-05-08T15:38:00+5:302018-05-08T15:43:41+5:30
गोठेधारकांनी गोठ्यांमधील म्हशींचे मलमुत्र वाहून नेणाऱ्या मलवाहिन्या थेट महापालिकेच्या भुमिगत गटारीत जोडल्या असल्यामुळे अनेकदा मैला साचून गटारी नादुरूस्त होऊन मलमुत्र रस्त्यावर पसरते.
नाशिक : आठवडाभरापासून वडाळारोडवरील प्रभाग २३मधील जयदीपनगरपासून चिश्तिया कॉलनीपर्यंत रस्त्यावर गोठ्यांमधील मलमुत्र मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने परिसरातील रहिवाशी त्रस्त झाले. वारंवार तक्रार करुनही याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून कु ठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात रहिवाशांनी मंगळवारी (दि.८) रास्ता रोको आंदोलन केला.
वडाळागावासह वडाळारोड परिसर म्हशींच्या गोठ्यांसाठी ओळखला जातो. अस्वच्छता, घाणीचे साम्राज्यामुळे नेहमीच हा परिसर चर्चेत असतो.
गोठेधारकांनी गोठ्यांमधील म्हशींचे मलमुत्र वाहून नेणाऱ्या मलवाहिन्या थेट महापालिकेच्या भुमिगत गटारीत जोडल्या असल्यामुळे अनेकदा मैला साचून गटारी नादुरूस्त होऊन मलमुत्र रस्त्यावर पसरते. त्यामुळे अनेकदा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. मागील आठ दिवसांपासून पुन्हा या भागातील गटारी रस्त्यावर वाहू लागल्यामुळे सर्वत्र मलमुत्र पसरल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.
यामुळे जयदीपनगर, मिल्लतनगर, चिश्तीया कॉलनी हा संपुर्ण परिसर वडाळा रस्त्याच्या दुतर्फा असल्याने बाधित झाला होता. या भागात प्रचंड दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. ही बाब नगरसेवक शाहीन मिर्झा यांच्या निदर्शनास रहिवाशांनी आणून दिली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मिर्झा यांनी अधिका-यांना याबाबत विचारणा करुन तत्काळ गटारी दुरूस्तीचे आदेश दिले मात्र संबंधितांनी त्यांच्या आदेशाला वटाण्याच्या अक्षता लावल्या. अखेर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक मंगळवारी सकाळी पहावयास मिळाला. सर्व कॉलन्यांमधील महिला व पुरूषांनी एकत्र येत मिर्झा यांना बोलावून घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
गोठेधारकांविरोधात पर्यावरण रक्षण कायद्यान्वये गुन्हा
वडाळा गावालगत असलेल्या जेएमसीटी कॉलेजजवळील म्हशींच्या गोठ्यातील मलमूत्र हे सार्वजनिक रस्ता तसेच परिसरात उघड्यावर सोडल्याने दुर्गंधी पसरवली आहे़या गोदावरील व नंदीनी नदी प्रदुषित होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ या प्रकरणी विनोद माडीवाले यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीवरून गोठेमालक हैदर खोत डेअरी, वसिम गुलाम गौस कोकणी, बिलाल कोकणी, सांडू हाजी कोकणी, दस्तगिर कोकणी, गुलाम गोस, शहनवाझ कोकणी यांच्या विरोधात पर्यावरण रक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़