नाशिकमधील वडाळा झोपडपट्टी हटवली, आता श्रमिकनगर झोपडपट्टीकडे वळवणार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 06:17 PM2017-12-18T18:17:23+5:302017-12-18T18:17:47+5:30
झोपडपट्टीवर लवकरच कारवाई : महापालिका करणार बळाचा वापर
नाशिक - महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पंधरा वर्षांपासून वसलेल्या वडाळागावातील झोपडपट्टीवर जेसीबी चालविल्यानंतर आता गंजमाळवरील श्रमिकनगरकडे मोर्चा नेण्याची तयारी सुरु केली आहे. श्रमिकनगरमध्येही सुमारे तीनशे लाभार्थ्यांना वडाळा येथील घरकुल योजनेत लाभ देण्याचे निश्चित होऊनही संबंधित लाभार्थी झोपडी सोडायला तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेने आता बळाचा वापर करण्याच्यादृष्टीने हालचाली चालविल्या आहेत.
सुमारे १५ वर्षांपूर्वी वडाळानाका परिसरातील झोपडपट्टी महापालिकेने वडाळागाव परिसरात स्थलांतरीत केली होती. त्यानंतर, सावित्रीबाई फुलेनगर असे नामकरण झालेल्या या झोपडपट्टीतील सुमारे ३५० लाभार्थ्यांना जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत वडाळागाव येथे साकारलेल्या ७२० घरकुलांच्या योजनेत लाभ देण्यात आला होता. परंतु, लाभ देऊनही संबंधितांनी आपले झोपडी सोडली नव्हती, त्यामुळे महापालिकेने वडाळागाव झोपडपट्टी जमिनदोस्त करण्याची कारवाई पार पाडली. या कारवाईमुळे महापालिकेची जागा मोकळी होण्याबरोबरच शंभर फुटी रस्त्यावरील अडथळाही दूर झालेला आहे. वडाळागाव येथे राबविलेल्या मोहिमेनंतर आता महापालिकेने गंजमाळवरील श्रमिकनगर झोपडपट्टीकडे आपला मोर्चा नेण्याची तयारी चालविली आहे. श्रमिकनगर येथील सुमारे ३०० लाभार्थ्यांना वडाळागाव येथील घरकुल योजनेत लाभ देण्याचे निश्चित झाले आहे. परंतु, संबंधित रहिवाशांकडून सोडतीला प्रतिसादच दिला जात नसल्याने स्थलांतराचा प्रश्न भिजत पडला आहे. महापालिकेने मात्र, आता वडाळागावची झोपडपट्टी हटविल्यानंतर श्रमिकनगरचाही प्रश्न निकाली काढण्याची तयारी केली असून लवकरच वडाळाप्रमाणेच श्रमिकनगरवरही जेसीबी चालविला जाणार आहे. वेळ पडल्यास बळाचा वापर करण्याचीही तयारी महापालिकेने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.