वडाळागावातील गोठे डिसेंबरअखेर हटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:10 AM2018-11-13T00:10:56+5:302018-11-13T00:11:57+5:30
वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
इंदिरानगर : वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र उघड्यावर व रस्त्यावर सोडण्यात आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे गावात माणसे राहतात की जनावरे असा प्रश्न नागरिक करीत होते. त्याची दखल घेत अखेर प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सदरचे गोठे हलविण्यासाठी गोठे मालकांना डिसेंबरपर्यंत डेडलाईन दिली आहे. वडाळागावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी संपूर्ण शेती होती. शेती व हातावर काम करणारी वस्ती म्हणून वडाळागावाची ओळख होती. त्यानंतर मात्र जमिनीला भाव मिळू लागल्याने शेती विकून याठिकाणी वसाहत निर्माण झाली. सुमारे २० वर्षांपूर्वी गावात एक ते दोन जनावरांचे गोठे होते. परंतु आज त्यांची संख्या सुमारे पंचवीस ते तीसच्या घरात गेली आहे. प्रत्येक जनावरांच्या गोठ्यात सुमारे सहाशे ते सातशे जनावरे आहेत. या सर्व गोठ्यांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने सर्वच गोठेधारकांकडून गोठ्याच्या बाहेर खड्ड्यात किंवा नाल्यात मलमूत्र सोडून दिले जात आहे. तसेच काही गोठेधारकांनी खत म्हणून मलमूत्र विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले आहे.
दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात
रस्त्यावर मलमूत्राची घाण व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नेहमीच साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता नूतन वर्षाच्या आत गावातील जनावरांचे गोठे हटवण्यात येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.