वडाळारोडवर गटारगंगा
By admin | Published: May 30, 2016 10:13 PM2016-05-30T22:13:24+5:302016-05-30T23:55:52+5:30
पालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नाशिक : महिनाभरापासून वडाळा रोडवर रहनुमा उर्दू शाळेपासून थेट नासर्डी पुलापर्यंत रस्त्यावर गटारीचे सांडपाणी दिवसभर वाहत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळपासूनच येथील भूमिगत गटारीचे चेंबर ओसंडून वाहण्यास सुरुवात होते. यामुळे विद्यार्थी व नागरिकांना येथून मार्गक्रमण करताना नाकाला रुमाल लावावा लागतो. तसेच सकाळी व दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या वाहनांमुळे पायी किंवा दुचाकीवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर सांडपाणी उडून गणवेश खराब होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. मागील महिनाभरापासून या रस्त्यावर गटारगंगा वाहत असून, याकडे महापालिकेच्या भुयारी गटार दुरुस्ती विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रार करूनदेखील चेंबरची दुरुस्ती केली जात नसल्याने गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
सांडपाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने गटार दुरुस्त करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे. गटारीचे सांडपाणी दिवसभर वाहत असून नासर्डी पुलानजीक असलेल्या निमुळत्या भागात जाऊन साचते. यामुळे पुलाजवळ सांडपाण्याचे डबके साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. महापालिकेच्या भुयारी गटार दुरुस्ती विभागाने तातडीने कायमस्वरूपी येथील तुंबलेल्या चेंबरची दुरुस्ती करून गटारीचे वाहणारे सांडपाणी थांबविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.