शाळेपासून दुरावलेली वाडी, वस्तीतील मुलं पुन्हा आली शिक्षण प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:42+5:302021-08-22T04:16:42+5:30
कोरोना संकटकाळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वाडी, वस्ती, गावांत जाऊन परिषद की पाठशाला उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. ...
कोरोना संकटकाळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वाडी, वस्ती, गावांत जाऊन परिषद की पाठशाला उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले.
अभाविपने ९ जुलैच्या संघटना स्थापना दिनाचे औचित्य साधत १ ते ९ जुलैदरम्यानच्या कालावधीत हा विशेष उपक्रम राबवत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणाशी असलेले नाते टिकविण्यासाठी शाळेपासून आणि शिक्षणापासून दुरावत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या परिसरात जाऊन मंदिर, सामाजिक सभागृह अशा मिळेल त्या ठिकाणी उपलब्ध साधनांच्या आधारे सुरक्षितपणे एकत्रित करून पाठशालेत शिकवण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केले.
अभाविपच्या परिषद की पाठशाळा उपक्रमात नाशिक महानगर भागातील सातपूर, सिडको, कॉलेज रोड, गंगापूर रोडसह अंबड, सातपूर कॉलनी, विल्होळी, पाथर्डी, हेडगेवारनगर, संत कबीरनगर भागात ८२ विद्यार्थी व ६१ विद्यार्थिनी अशा जवळपास १४६ विद्यार्थ्यांना अभाविपच्या ४२ पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहभागातून शिक्षणाचे धडे दिले, तर, नाशिक रोड भागातील सुमारे ३० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लाखलगाव, सिन्नरफाटा, गारुडवाडी, पांढुर्ली, पिंपळगाव (घाडगा), पिंपळगाव वस्ती, टाकेद, कुलकर्णी गल्ली, बांवळे वस्ती यासारख्या १० ठिकाणी २३५ हून अधिक विद्यार्थ्यांना पाठशालेत शिकवण्याचे काम केले. मालेगाव भागात अभाविपच्या ३३ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २ तालुक्यांतील १३ गावांमध्ये हा उपक्रम एक महिना राबविताना ७७३ विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहाशी जोडून ठेवले. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही विद्यार्थ्यांनी तर संकटाच्या दीड वर्षांत शाळेचे तोंडही पाहिलेले नसताना एका वर्गातून दुसऱ्या वर्गात गेले खरे, पण त्यांचा अभ्यास आणि शाळेशी संबंध आला नाही. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता ओळखून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यावर उपाय ‘परिषद की पाठशाला’ उपक्रमाच्या माध्यमातून मार्ग काढत शहरातील विविध भागांसह वाडीत, वस्तीत, गाव-खेड्यांत जाऊन या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा अल्पसा प्रयत्न करून अन्य सामाजिक सेवाभावी संस्थांसमोरही आदर्श निर्माण केला आहे.
190821\1340585319nsk_59_19082021_13.jpg
अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचा परीषद की पाठशाला उफक्रम्