वडनेरभैरव पोलिसांकडून १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 10:05 PM2021-04-29T22:05:02+5:302021-04-30T00:51:38+5:30
वडनेरभैरव : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल विकत घेऊन त्यांची रक्कम अदा न करता फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना वडनेरभैरव पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच ६७ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी परत मिळण्याची ही विभागातील पहिली घटना मानली जात आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची नाशिक जिल्ह्यात बदली झाल्यापासून फसवणूक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे मिळाले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिघावकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात पोलिसांना यश आले आहे. वडनेरभैरव पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून व्यापाऱ्यांकडे असलेले त्यांचे सुमारे एक कोटी २१ लाख रुपये परत करण्यात आले. पैसे परत करण्यास नकार देणाऱ्या १६ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यातील आठ जणांना अटक केली आहे.
निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना पोलिसांनी मदतीचा हात दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले आहे. दिघावकर व पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल जिल्हाभरात कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांना पैसे परत न देणाऱ्या परराज्यातील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही व्यापाऱ्यांनी अवधी मागून घेतला आहे. द्राक्ष पिकासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व व्यापारी बांधावर येऊन माल घेत असल्याने सुरक्षेची हमी राहत नाही. शेतकरी विश्वास ठेवून परराज्यातील व्यापाऱ्यांना माल देत असतो, जर स्थानिक ग्रामपंचायतीकडून सुरक्षा म्हणून व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेतली, तर फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.
-गणेश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, वडनेर भैरव.