वडझिरे - ब्राह्मणवाडे रस्त्याची लोकवर्गणीतुन दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:56+5:302021-07-24T04:10:56+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील वडझिरे-ब्राह्मणवाडे या रस्त्याची लोकवर्गणीतून दुरुस्ती करण्यात आली. रस्ता दुरुस्त झाल्याने ग्रामस्थांसह वाहन चालकांमध्ये ...
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील वडझिरे-ब्राह्मणवाडे या रस्त्याची लोकवर्गणीतून दुरुस्ती करण्यात आली. रस्ता दुरुस्त झाल्याने ग्रामस्थांसह वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वडझिरे - ब्राह्मणवाडे या रस्त्याची झालेली दुरवस्था वाहन चालकांबरोबर शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरणाऱ्या या रस्त्याची सरपंच आंबेकर, उपसरपंच मनोहर बोडके, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भीमराव दराडे आदींसह ग्रामस्थांच्या मदतीने लोकवर्गणी जमा केली. या जमा झालेल्या रकमेतून या रस्त्यावरील खड्डे मुरमाने बुजविण्याचे काम करण्यात आले. दोन दिवसांच्या श्रमातून हा रस्ता दुरुस्त करण्यात आला.
वडझिरे-ब्राह्मणवाडे हा रस्ता वडझिरेकरांसाठी एकमेव महत्त्वाचा रस्ता आहे, तसेच शेतकऱ्यांना नाशिक बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी नेण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था बनली होती. हा तीन किलोमीटर अंतराचा रस्ता खड्ड्यांमुळे व साइड पट्ट्यांमुळे अरुंद झाल्याने अपघातप्रवण बनला आहे. रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वेळेचा अपव्यय, वाहनांची दुरवस्था, तसेच आर्थिक फटका विशेषतः वाहन चालकांना शारीरिक त्रासही सहन करावा लागत आहे. अशा या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित विभाग, राजकीय पदाधिकाऱ्यांकडे अनेकदा पाठपुरावा करूनही दुरुस्ती होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
-------------------------
सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे उपसरपंच मनोहर बोडके, भीमराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमवून या रस्त्याची दुरुस्ती केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
-------------------
सिन्नर तालुक्यातील वडझिरे - ब्राह्मणवाडे या रस्त्यावरील खड्डे लोकवर्गणीच्या माध्यमातून बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी मनोहर बोडके, भीमराव दराडे, नामदेव भाबड आदी.
(२३ नायगाव)
230721\23nsk_5_23072021_13.jpg
२३ नायगाव