कोरोनो संकटातही बॉश कंपनीत वेतन वाढ ; २३० हंगामी कामगारांना कायम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 07:41 PM2020-05-03T19:41:30+5:302020-05-03T19:44:59+5:30
कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असताना नाशिकमधील सातपूर औद्योगित वसाहतीतील बॉश कंपनीने कामगारांना घसघशीत वेतनवाढ दिली देत सुखद धक्का दिला आहे. कंपनी व्यस्थापन आणि कामगार संघटना यांच्तील करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर २३० हंगामी कामगारांना कायम करण्यात येणार असून कामगारांना ४० महिन्यांचा फरकही मिळणार आहे.
नाशिक : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून कामगारांवर आसमानी संकट कोसळले असतांना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतन वाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. या करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तर अशा संकट काळातही २३० हंगामी कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक करार असल्याची माहिती बॉश युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कामगार व व्यावस्थापनामध्ये गेल्या ४० महिन्यांपासून हा करार प्रलंबित होता. दीड महिन्यांपूर्वी नवीन युनियन पदाधिकाऱ्यांनी कराराची बोलणी पुढे चालू ठेवत कंपनीचे स्थानिक व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकारी यांच्यात सकारात्मक बोलणी झाल्यानंतर रविवारी (दि.३) उभय पक्षांनी अंतिम करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार साडेसात हजार रुपये वेतनवाढ आणि सात टक्के उत्पादन वाढ दिल्यानंतर अडीच हजार (व्हेरिएबल बास्केट) असे दहा हजार रुपये दरमहा कामगारांना मिळणार आहेत. त्यासोबतच सीपीआय डी लिंकिंगचे तीन हजार रुपये वेगळे मिळणार आहेत. दि.१ जानेवरी २०१७ रोजी हजेरी पटावर असलेल्या सर्व कायम कामगारांना ही वेतनवाढ मिळणार असून दि.३ मे पासून १३० हंगामी कामगार कायम होणार आहेत. पुढील सहा महिन्यात उर्वरित शंभर हंगामी कामगार कायम होतील, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव यांनी दिली. या करारावर कंपनीचे उपाध्यक्ष अनंतरामन, उपाध्यक्ष मुकुंद भट, मनुष्यबळ महाव्यवस्थापक श्रीकांत चव्हाण, तसेच सतीश कुमार,जतीन सुळे,तमाल सेन,शरद गीते यांच्यासह युनियनकडून अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी, उपाध्यक्ष भाऊसाहेब बोराडे, नितीन बिडवाई, सहचिटनीस हरिभाऊ नाठे, विनायक येवला, खजिनदार नंदू अहिरेआदिंनी स्वाक्षऱ्या केल्या.
४० महिन्यांचा फरक मिळणार
व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करुन केवळ पैसे न पाहता भविष्यकाळाचा विचार केला.नाशिकच्या कारखान्यात नवीन गुंतवणूक करण्याचे आश्वासन वरिष्ठ व्यवस्थापनाने दिले आहे. कामगारांना ४० महिन्यांचा फरक मिळणार आहे. करारामुळे कामगारांमध्ये विश्वासाचे आणि दिलासादायक वातावरण निर्माण होणार आहे.
-अरुण भालेराव. अध्यक्ष बॉश कामगार संघटना.