एसटीचालकावर उदरनिर्वाहासाठी मजुरीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:23 PM2020-08-08T22:23:40+5:302020-08-09T00:14:51+5:30
कोरोनाचा फटका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीने लालपरी आगारातच लॉक झाली. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात कंटेन्मेंट झोनवगळता स्थानिक स्तरावर जिल्हाअंतर्गत बसफेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रवाशांनी कोरोनाच्या भीतीने लालपरीकडे पाठ फिरवली. परिणामी लालपरी रस्त्यावर धावलीच नाही. ७ जुलैपासून स्थानिक बस फेºया सुरू झाल्या असून, आता येवला-नाशिक फेºयाही सुरू झाल्या आहेत. मात्र, प्रवाशांचा अल्पप्रतिसाद आहे. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येऊन एसटीला पहिले दिवस येतील, अशी कर्मचारीवर्गाची आशा आहे.
योगेंद्र वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कोरोनाने अनेक छोटेमोठे उद्योग-व्यवसाय बंद झाले तर अनेक कंपन्याही टाळेबंद झाल्या. यामुळे अनेक बेरोजगार झाले असल्याने जगण्याच्या संघर्षात पोटापाण्यासाठी अनेकांना मजुरी करावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या येवला आगारातील बसचालक उदरनिर्वाहासाठी गवंड्याच्या हाताखाली मजुरी करण्याची वेळ आली आहे.
कोरोनाकाळात सर्वांनाच घरात बसावे लागले. परिणामी जवळील पैसे संपल्यानंतर जगण्यासाठी, पोटासाठी संघर्ष करावा लागतो आहे. सध्या अनलॉक टप्पा तीन सुरू झालेला असला तरी अनेक कंपन्या वा अस्थापना अजूनही सुरू झालेल्या नाहीत. एसटी महामंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने प्रवाशीवर्गाअभावी रस्त्यावर धावत नसल्याने महामंडळाच्या सेवेत असणाºया अनेकांपुढे उदरनिर्वाह कसा चालवावा, कुटुंब कसे सांभाळावे असा गंभीर प्रश्न पडला आहे. एसटी सेवाच बंद पडल्याने काम नाही, पगार नाही अशा अवस्थेत असणाºया येवला येथील आगारातील चालक विजय खैरनार यांनी पोटासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम सुरू केले आहे. या रोजंदारीतून मिळणाºया पैशातून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहे.
येवला आगारात एकूण २४३ कर्मचारी कार्यरत आहेत. यात प्रशासकीय कर्मचारी २१, चालक ११५, वाहक ८० तर कार्यशाळा कर्मचारी २७ आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने एप्रिलमध्ये पूर्ण, मार्चमध्ये ७५ टक्के, मेमध्ये ५० टक्के तर जून, जुलैमध्ये पगारच दिलेले नाही. पगाराअभावी कर्मचाऱ्यांपुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोटापाण्यासाठी काहींनी मिळेल ते काम करणे पसंत केले असून, काहींनी छोटे छोटे व्यवसायही सुरू केले आहेत.मी येवला डेपोमध्ये गेल्या चार वर्षांपासून वाहक म्हणून काम करतो. सध्या कोरोनामुळे एसटीकडे प्रवासी यायला तयार नाही. सध्या बसेस आगारात उभ्या आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कामाचा शोध घेतला, मिस्तरीकडे काम मिळाले. दोन महिन्यांपासून मी त्यांच्याकडे मजुरी काम करतो. वाळू चाळायचे, माल कालवायचे, पाट्या भरून द्यायचे, विटा द्यायचे काम करतो. माझ्या कुटुंबात दोन मुली, एक मुलगा, पत्नी आहे.
- विजय खैरनार, चालक, येवला बस आगार