वाघरान भकास : वनाधिकारी अन् लाकूड तस्करांची अभद्र युती, वनतळ्यांना गळती वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:59 AM2018-01-20T00:59:53+5:302018-01-20T01:00:34+5:30
सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : डावखल जंगल नव्वदच्या दशकात बागलाण तालुक्यातील डावखल या सागाच्या जंगलात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगणारे आदिवासी बांधव आजही आहेत.
सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : डावखल जंगल नव्वदच्या दशकात बागलाण तालुक्यातील डावखल या सागाच्या जंगलात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगणारे आदिवासी बांधव आजही आहेत; मात्र वनाधिकारी आणि लाकूड तस्कर यांच्या अभद्र युतीमुळे झालेल्या वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्याचा जीव धोक्यात आल्याचे चित्र पश्चिम भागातील राखीव जंगलात निदर्शनास आले. एकेकाळी बागलाण हे पट्टेदार वाघांचा अधिवास असलेले वाघरान म्हणून ओळखले जात होते. विकासाच्या नावाने जंगलात वृक्ष तोडून झालेले रस्ते बनले तस्करीचे मार्ग, मानवाने जंगलावर केलेले अतिक्र मण यामुळे मानवी वस्तीत होणारा वन्यप्राण्यांचा शिरकाव, लाखो रुपये खर्चून बांधलेल्या वनतळ्यांना लागलेली गळती या सर्वांचा एकत्रित परिणाम वन्यजिवांच्या नैसर्गिक अधिवासावर झाला आहे. वृक्षतोड आणि वनतळ्यांना लागलेल्या गळतीमुळे सावज आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेल्या बिबट्याला कधी विहिरीत पडून स्वत: शिकार होतो तर कधी बिबट्या कीटकनाशक फवारण्याच्या टाकीतले पाणी पिऊन जीव गमवावा लागत आहे. तर मोरांचीदेखील हीच अवस्था. ससे, तितर, बटेर, लाव्या ,कोल्हे, रानडुक्कर यांची राजरोज शिकार केली जाते. यामुळे वन्यजिवांचा जीव धोक्यात आला आहे. बागलाण तालुक्यात डावखल, केळझर, ततानी, बारीपाडा, मळगाव, भवाडे, तळवाडे, दसाने, केरसाने, दोधेश्वर, कोटबेल, लखमापूर, चौगाव, चिराई, महड , राहूड, बिलपुरी, रातीर, टिंगरी, पिसोळ, नंदिन, दरेगाव, लाडूद, पारनेर, ढोलबारे, आव्हाटी, कौतिकपाडे, मुल्हेर, जाखोड, बोर्हाटे या परिसरात राखीव वनक्षेत्र आहे. या भागात दरवर्षी बेडा, आवळा, सीताफळ, साग, चिंच, बांबू आदी प्रकारच्या हजारो वृक्षांची गेल्या चार दशकांपासून दरवर्षी लागवड होते मात्र आजही बहुतांश डोंगर बोडकेच बघायला मिळत असल्यामुळे ही लागवड कागदावरची राहिल्याचे चित्र बागलाण मध्ये बघायला मिळते. याला सरकारी बाबू आण िलोकप्रतिनिधी ही जोडगोळी देखील कारणीभूत असल्याचे जाहीरपणे बोलले जाते.लोकप्रतिनिधी आण िसंबधित सरकारी यंत्रणेचा महिना दोन महिन्यात नक्कीच आढावा घेतला जातो.