शहिदांना खऱ्या अर्थाने वाहिली श्रद्धांजली : वीरपत्नींचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:51 AM2019-02-27T00:51:38+5:302019-02-27T00:52:44+5:30
‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो.
नाशिक : ‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. भारतमातेच्या रक्षणार्थ आजपर्यंत ज्या सुपुत्रांनी आपले बलिदान दिले आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली.’’ अशा शब्दांत शहरासह जिल्ह्यातील वीरपत्नींनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.
पुलवामामध्ये भारताने ४० शूरवीर जवान गमावले. त्यांचे ४० कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. या हल्ल्यामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला होता. या हल्ल्यानंतर देशातून एकच नारा बुलंद केला जात होता, तो म्हणजे ‘धडा शिकवा, बदला घ्या’. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बचा वर्षाव करत तीनशेहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष आणि वायुसेनेचे अभिनंदन सुरू झाले. हुतात्म्यांच्या वीरपत्नींशी संवाद साधला असता त्यांनीही या कारवाईचा अभिमान बाळगून भारतीय वायुदलाचे अभिनंदन करत आभार मानले. पुलवामामध्ये शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला, असेही त्यांनी सांगितले.
भारत सरकारने याअगोदर जर आदेश दिले असते तर अशी कारवाई खूप अगोदरच सेनेकडून झाली असती; मात्र देर आये दुरुस्त आये, याप्रमाणे वायुसेनेला जे आदेश सरकारने दिले व सेनेने ज्या पद्धतीने शहिदांच्या बलिदानाचा बदला घेतला तो अभिमानास्पद आहे. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय.
- कविता वसंत लहाने, वीर जवानाची कन्या
मनस्वी आनंद झाला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वायुसेनेने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. भारतासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना खºया अर्थाने वायुदलाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याच्या रुपाने पाकला ठोस उत्तर मिळाले आहे. अशा प्रकारच्या कारवाई यापूर्वीच होणे आवश्यक होते.
- रूपाली बच्छाव, वीरपत्नी, सातपूर
जगातील चौथ्या क्रमांकाचे वायुदल म्हणून भारतीय वायुसेनेची ओळख आहे. त्यांची ताकद आज अवघ्या जगाने अनुभवली. सरकारने भारतीय सेनेच्या तीनही दलांचे हात असेच मोकळे ठेवावे, जेणेकरून घुसखोरी करणाºया दहशतवाद्यांना जवान यमसदनी धाडतील आणि देश अधिकाधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल. हा हवाई हल्ला पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये दडलेल्या अतिरेक्यांना खूप काही शिकवून गेला असावा. - रेखा खैरनार, वीरपत्नी, गंगापूररोड
भारताने केलेला हा हवाई हल्ला दहशतवादाची पाळेमुळे नेस्तनाबूत करणारा ठरला. या हल्ल्यामुळे शाहिदांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. भारताच्या सैन्याविषयी अन्य देशांनी जे गैरसमज करून ठेवले आहेत, त्यांचे गैरसमजही दूर झाले असतील. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अशाप्रकारच्या कारवायांची गरज आहे. काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारताकडेच राहणार आहे, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे. - सुषमा मोरे, वीरपत्नी, पाथर्डी फाटा
एकास दहा हे समीकरण अचूक आहे. असेच समीकरण जर कायम ठेवले तर पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलेले दहशतवादी देशाकडे वाकडी नजर करणार नाही. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. या हवाई हल्ल्याची कारवाई अत्यंत अवघड होती; मात्र वायुदलासह भारतीय सेनेच्या शब्दकोशात ‘अवघड‘, ‘अशक्य’ हे शब्दच नसल्याचे यावरून पुन्हा सिध्द झाले.
- अश्विनी तनपुरे, शहीद जवानाची पुतणी, गंगापूररोड
शहिदांना खºया अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. जवानांच्या आत्म्यांना या हल्ल्यामुळे शांती मिळाली. देशाकडे वाकडी नजर करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानला मोठा धडा मिळाला आहे. अशाप्रकारची कारवाई याअगोदरच झाली असती तर देशासाठी व सेनेसाठी चांगले झाले असते. भारतीय सेनेला सरकारने स्वतंत्र निर्णय घेऊ द्यावेत. - यशोदा गोसावी, वीरपत्नी