अंदाजपत्रकाच्या ठरावाची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 8, 2015 00:21 IST2015-10-08T00:16:49+5:302015-10-08T00:21:24+5:30
कामे खोळंबली : कुंभपर्व संपले तरी महापौर व्यस्त

अंदाजपत्रकाच्या ठरावाची प्रतीक्षा
नाशिक : ‘महासभेने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाचा ठराव प्राप्त झाला की कामाच्या निविदाप्रक्रिया राबविल्या जातील’, असे उत्तर महापालिकेत गेल्या दीड महिन्यापासून नगरसेवकांना खातेप्रमुखांकडून ऐकायला मिळत आहे. अगोदरच स्थायी समितीने सहा महिने विलंबाने सादर केलेल्या सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकाला महासभेने दि. २५ आॅगस्टला मंजुरी दिली; परंतु ४२ दिवस उलटूनही महासभेच्या अंदाजपत्रकाचा ठराव महापौरांकडून प्रशासनाला प्राप्त होऊ शकलेला नाही. त्यामुळे, अनेक धोरणात्मक निर्णय आणि विकासकामांचा खोळंबा झालेला आहे.
यावर्षी दि. २० फेब्रुवारीला आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीवर १४३७ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. याशिवाय, त्यात सिंहस्थाचेही ७४८ कोटी ५६ लाख रुपयांचे स्वतंत्र अंदाजपत्रक समाविष्ट होते. स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकावर दि. २४ फेबु्रवारीला बैठक बोलवत चर्चा केली; परंतु स्थायीकडून महासभेवर अंदाजपत्रक सादर करायला सहा महिने विलंबाने म्हणजे २५ आॅगस्टचा दिवस उजाडला. स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ३३२ कोटींची वाढ सुचवत अंदाजपत्रक १७६९ कोटी ९७ लाखांवर नेऊन पोहोचविले. वास्तविक अंदाजपत्रक हे मार्चअखेरपर्यंत महासभेकडून मंजूर होऊन त्याचा ठराव प्रशासनाला रवाना होणे आवश्यक असते. परंतु यंदा स्थायीने सहा महिन्यांहून अधिक काळ घेतल्याने महापालिकेचे विकासाचे गाडे बिघडले. आता महासभेकडून मंजुरी मिळून ४२ दिवस उलटून गेले तरी, महापौरांनी अंदाजपत्रकात सुधारणा व दुरुस्त्या सुचविण्यासाठी मुहूर्त लाभलेला नाही. महापौरांकडून अंदाजपत्रकाचा अधिक ठराव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत प्रशासनाचेही हात बांधलेले आहेत. अंदाजपत्रकाचा ठरावच प्राप्त न झाल्याने सद्यस्थितीत आयुक्तांकडूनच ठराव स्थायीच्या मंजुरीने महासभेवर पाठविले जात आहेत; परंतु धोरणात्मक निर्णय अथवा एखाद्या मोठ्या प्रकल्पासंबंधीच्या मंजुरीसाठी मात्र प्रशासनाची अडचण होत आहे. नगरसेवकांकडून कामांचा लकडा पाठीमागे लागला असल्याने त्यांना उत्तरे देताना प्रशासनाची मात्र तारांबळ उडताना दिसून येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणींमुळे प्रशासनासह पदाधिकारीही व्यस्त होते. दि. १८ सप्टेंबरला अखेरची पर्वणी आटोपल्यानंतर अंदाजपत्रकाच्या ठरावाला मुहूर्त लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना महापौर मात्र आता स्मार्ट सिटी अभियानात व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)