तपोवनाला स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा
By admin | Published: February 23, 2016 11:40 PM2016-02-23T23:40:56+5:302016-02-24T00:06:12+5:30
लोकप्रतिनिधींची तक्रार : पर्यटनस्थळाच्या स्वच्छतेसाठी एकच कर्मचारी
पंचवटी : दैनंदिन शेकडो भाविक पर्यटनस्थळ असलेल्या तपोवनाला भेट देत असतात. या तपोवन परिसरात स्वच्छता करण्याचे काम पालिका प्रशासनाकडे असले तरी पर्यटनस्थळाच्या स्वच्छतेसाठी मनपाने केवळ एक कर्मचारी नियुक्त केल्याची तक्रार प्रभागाच्या नगरसेवक ज्योती गांगुर्डे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या पाच ते सहा प्रभाग सभेत तपोवनात सफाई कर्मचारी वाढवा, अशी वारंवार सूचना करूनही त्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याने पर्यटनस्थळाकडे पालिकेचेच दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गांगुर्डे यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये असलेल्या तपोवनात एक तर गणेशवाडीत २८ सफाई कर्मचारी काम करतात.
तपोवनात सफाई कर्मचारी वाढवा, अशी मागणी केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी वाढले की तिकडे सफाई कर्मचारी संख्या वाढवितो असेच उत्तर दरवेळेस देऊन वेळ मारून देतात. गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कर्मचारी वाढविण्याची मागणी करूनही कर्मचारी संख्या वाढविली जात नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)