दुभाजकांना फुलझाडांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:46 AM2018-03-10T11:46:17+5:302018-03-10T11:46:17+5:30
नाशिक: ‘माझं नाशिक हरित नाशिक, सुंदर नाशिक’ या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिक शहर हरित व सुंदर व्हावे, असा संदेश महापालिका प्रशासन नागरिकांना देत असले तरी मनपाच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्याच प्रभागातील आरटीओ कॉर्नर ते म्हसरूळदरम्यान मुख्य रस्त्यात बांधलेल्या दुभाजकात एकही फुलझाड नसल्याने दुभाजक ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. आरटीओ कॉर्नर ते म्हसरूळ अशा २ ते ३ किलोमीटर अंतरावर वाहतूक नियंत्रणासाठी मनपाच्या वतीने रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बनविले आहेत. या दुभाजकांना आकर्षक रंगरंगोटीही करण्यात आली आहे. याशिवाय दुभाजकात फुलझाडे लावण्यासाठी मातीही टाकण्याचे काम करण्यात आले आहे, मात्र दुभाजकात कोणत्याही प्रकारची फुलझाडे लावलेली दिसत नाही. दुभाजक बनविल्याने वाहतूक नियंत्रणासाठी फायदा झाला, याशिवाय रस्त्याला चांगली झळाळी आली आहे. प्रशासनाने या दुभाजकात फुलझाडे लावली तर रस्त्यातील दुभाजकात लावलेल्या फुलझाडांमुळे परिसर आणखीनच आकर्षित दिसेल व खºया अर्थाने ‘माझं नाशिक हरित नाशिक, सुंदर नाशिक’ असे म्हणता येईल त्यामुळेच महापालिका प्रशासनाने तत्काळ या दुभाजकात सुंदर फुलझाडे लावण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी मेरी, म्हसरूळ परिसरातील नागरिकांनी केली आहे.