आरटीईच्या सोडतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:28 AM2019-05-25T00:28:46+5:302019-05-25T00:29:02+5:30
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसऱ्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही.
नाशिक : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसऱ्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसºया सोडतीची प्रतीक्षा कायम आहे.
आरटीईची प्रक्रिया यंदा आधीच दोन महिने उशिराने सुरू झाली असून, त्यात पहिल्या फेरीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपून आता दोन आठवड्यांचा कालावधी झाला असतानाही दुसरी यादी जाहीर होत नसल्याने आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील हे प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी पहिली सोडत जाहीर केली होती. त्यात जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सुरुवातील २६ एप्रिलनंतर ४ मे आणि १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतीअंति पहिल्या यादीतील दोन हजार ४८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. आरटीई अंतर्गत यंदा जिल्ह्यातील ४५७ शाळांत ५ हजार ७६४ जागा उपलब्ध आहेत.
पालकांमध्ये साशंकता व्यक्त
आरटीईच्या संकेतस्थळावर पहिल्या यादीला मिळालेल्या मुदतवाढीची माहिती अजूनही झळकत असून, दुसºया सोडतीविषयी कोणतीही सूचना नसल्याने पालकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. तसेच संकेतस्थळावर दुसरी यादी कधी जाहीर होणार आहे, त्या विलंब का होत आहे, याबाबत माहिती मिळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.