नूतन कुलगुरूंची चौथ्या दिवशीही प्रतीक्षा
By admin | Published: February 11, 2016 12:16 AM2016-02-11T00:16:12+5:302016-02-11T00:16:37+5:30
टोलवाटोलवी : कभी हा कभी ना
नाशिक : आरोग्य विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर हे नांदेडमधील सत्कार सोहळ्यातच अडकून पडल्याने नियुक्तीनंतर चार दिवसांनंतरही त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. विशेष म्हणजे म्हैसेकर यांनी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे मंगळवारीच डॉ. जमदाडे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे; मात्र आपण पदभार सोडलेलाच नसल्याचा दावाही त्यांनी केल्याने म्हैसेकरांच्या या भूमिकेमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन कुलगुरु निवडीच्या हालचाली अत्यंत गतिमान झाल्या. कुलगुरुपदाची जाहिरात उशिरा करण्यात आल्याने कुलगुरू निवडीची प्रक्रियादेखील विलंबानेच होईल अशी अटकळ बांधली जात होती; मात्र राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने फेब्रुवारी अखेर विद्यापीठाला नूतन कुलगुरू लाभतील असे निवड समितीकडून ठामपणे सांगण्यात आले होते. सुरुवातीच्या दोन बैठका स्थगित झाल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया मात्र गतिमान (पान ७ वर)
झाली आणि ६ फेब्रुवारी रोजी कुलगुरू पदासाठीच्या मुलाखती घेण्यात आल्या.
रविवारची सुटी असतानाही राज्यपालांनी कार्यालयात हजर राहून अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातून नूतन कुलगुरू म्हणून डॉ. म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा केली. संपूर्ण राजभवन रविवारच्या दिवशी कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेत राबलेले असतानाही म्हैसेकर यांनी त्याबाबतचे गांभीर्य दाखविले नसल्याचेच दिसते. सोमवारी नांदेडला पोहोचलेले कुलगुरू नांदेडमध्येच अडकून पडले आहेत. कुलगुरूपदाचा कार्यभार ते कधी स्वीकारणार या संदर्भात विद्यापीठातील अधिकारी वर्गदेखील अंधारातच आहे.
या संदर्भातील माहिती जाणून घेतली असता नांदेडमध्ये कुलगुरूंचा सोमवारपासून अनेक राजकीय पक्षांकडून सत्कार करण्यात येत आहे. प्राध्यापक, प्राचार्यांच्या संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे त्यांनी हारतुरे स्वीकारले. शिवाय वैद्यकीय महाविद्यालयातील काही बैठका मार्गी लावण्यात म्हैसेकर व्यस्त असल्याचे समजले. दररोज आज-उद्या म्हणता म्हणता चार दिवस उलटून गेले आहेत. नाशिकला येण्याचा ‘मुहूर्त’ ते कधी साधतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
—इन्फो—
पदभाराचा मुद्दा आणि ती मुलाखत
आपण कुणाकडेही डीन पदाचा पदभार सोपविला नसल्याचे म्हैसकर यांनी मंगळवारी रात्री लोकमतशी बोलताना सांगितले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी पद सोडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत इन्ट्रापॅथी संदर्भातील आपली भूमिकादेखील मांडली होती याकडे त्यांचे लक्ष वेधले असता नांदेडमध्ये अशी कोणतीच पत्रकार परिषद घेतली नसल्याचेही त्यांनी सांगितले; मात्र या संदर्भात स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त छापून झाल्याचे सांगूनही त्यांनी त्याचा इन्कार केला.