ममदापूर परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा
By admin | Published: September 6, 2014 10:13 PM2014-09-06T22:13:59+5:302014-09-07T00:12:54+5:30
ममदापूर परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा
ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, रहाडी, देवदरी या परिसरातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परिसरातील विहिरींना अद्याप पाणी उतरलेले नाही. यामुळे शेतकरी चिंतित आहेत.
यावर्षी तब्बल एक महिना उशिराने चालू झालेला पाऊस जेमतेम बरसला. त्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पिके वाढीच्या स्थितीत असताना पावसाने दडी मारल्याने पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक
कणाच मोडकळीस आला. त्यात काढणीला आलेला कांदा सडला, गहू, हरभरा आदि पिकांचे
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
होते. या संकटावर मात करीत परिसरातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून यावेळी पिके उभी केली; परंतु पावसाचे प्रमाण अल्प असल्यामुळे पिकांचे अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही.
पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटूनदेखील विहिरींना पाणी नसल्याने पोळ कांदा लेट होत असून, कमी दिवसांत येणारे पिक उशिरा होत आहे. गारपिटीमध्ये कांद्याचे बियाणे पूर्णपणे नष्ट झाले.
दहा ते बारा हजार रुपये पायलीने कांदा बियाने घेऊन शेतात टाकले रोप लावणीयोग्य झाले मात्र पाणी नसल्याने शेतकऱ्यांना काहीही करता येत नाही. विहिरींना पाणी आले तरच कांद्याची लागवड करता
येणे शक्य आहे. अन्यथा रोप
वाया जाण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)