ताहाराबादच्या मोसम परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 12:07 AM2021-07-11T00:07:51+5:302021-07-11T00:08:22+5:30
ताहाराबाद : मोसम परिसरात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अगोदर खरीप हंगामातील झालेल्या पेरण्या वाया जाऊन दुबार पेरणीची वेळ येईल की काय, या भीतीने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत.

जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी अद्याप वरुणराजाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. शेतकरी बांधव जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बहुतांश भागात अद्याप खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या त्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यामुळे सद्यस्थितीत जोरदार पाऊस आल्यास झालेल्या पेरण्यांना जीवदान मिळेल तर उर्वरित पेरण्यांना वेग येईल. खरीप हंगामातील मका पिकावर येत असलेल्या अळीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. मागील काळात अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी बांधवांच्या हातून मका पीक गेले. त्यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. यंदाही या पिकाबाबत शेतकरी बांधवांच्या मनात भीती आहे. परिणामी मका पेरणीचे क्षेत्र कमी होऊ शकते.
यावर्षी पावसाळा चांगला राहील असा हवामान खात्याचा अंदाज होता. यामुळे बळीराजाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे या अपेक्षांवर पाणी फिरताना दिसत आहे.