पीककर्ज वाटपासाठी शंभर कोटींची प्रतीक्षा
By admin | Published: June 23, 2017 12:42 AM2017-06-23T00:42:05+5:302017-06-23T00:42:27+5:30
राज्य शिखर बॅँकेकडे पाठविलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेला पर्यायाने शेतकऱ्यांना शंभर कोटींची प्रतीक्षा करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खरीप हंगामात तातडीची दहा हजारांची पीककर्जासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शिखर बॅँकेकडे पाठविलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावावर गुरुवारपर्यंत (दि.२२) निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना शंभर कोटींची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यास टपाल खाते व जिल्हा बॅँकांना हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत आठ महिन्यांपासून पडून असलेल्या ३४१ कोटींच्या नोटा बदलून देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्हा बॅँकेच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. मात्र तोंडावर असलेल्या खरीप हंगामासाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना कर्ज कसे वाटप करायचे? हादेखील एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यातच राज्य सरकारने खरिपासाठी तातडीची दहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. या दहा हजार रुपये मदतीच्या निकषात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे सुमारे २० हजार शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यांना वाटप करावयासाठी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना वाटप करावयासाठी १०० कोटी रुपये मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा बॅँकेने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मंगळवारी सादर केला आहे. मात्र या १०० कोटी रुपयांच्या प्रस्तावावर अद्याप राज्य शिखर बँकेकडून काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शंभर कोटी रुपये मिळण्याची तूर्तास तरी प्रतीक्षा करावी लागत आहे.