पोलिसांना ‘एक्सपर्ट ओपिनियन’ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:46+5:302021-05-21T04:16:46+5:30
नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात मागील महिन्यात घडलेल्या ऑक्सिजन गळती प्रकरणाच्या पोलीस तपासात शेकडोंचे जाबजबाब आतापर्यंत नोंदविण्यात आले ...
नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात मागील महिन्यात घडलेल्या ऑक्सिजन गळती प्रकरणाच्या पोलीस तपासात शेकडोंचे जाबजबाब आतापर्यंत नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांना दुर्घटनेचा ठपका निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात मागील महिन्यात २१ तारखेला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टाकीला गळती लागली होती. या दुर्घटनेत एकूण २२ रुग्णांचा बळी गेला होता. या दुर्घटनेप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजनकुमार सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. या तपासात विविध लोकांचे जबाब आतापर्यंत पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. टाकीचा ऑक्सिजन पाईप कसा आणि का तुटला? याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेतले जाणार आहे. यानंतर त्यानुसार पोलीस संबंधितांवर या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करत ठपका ठेवणार आहेत. एकूणच या दुर्घटनेला महिनाभराचा कालावधी उलटूनही अद्याप दुर्घटनेला जबाबदार कोण? हे पोलीस किंवा अन्य शासकीय यंत्रणेला निश्चित करता आलेले नाही. शासनाच्या आदेशानुसार या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र समितीही नियुक्त करण्यात आली आहे.