खरिपाच्या कर्जासाठी बळीराजाला प्रतीक्षा
By admin | Published: June 15, 2017 12:34 AM2017-06-15T00:34:30+5:302017-06-15T00:34:48+5:30
महसूलमंत्र्यांची घोषणा हवेतच : जिल्हा बॅँकेच्या तिजोरीत खडखडाट
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खरिपासाठी शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा करून तीन दिवस उलटूनही नाशिक जिल्ह्यातील बळीराजाला खरिपाच्या पीककर्जासाठी प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे चित्र आहे. जिल्हा बॅँकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने बळीराजाला पीककर्ज उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा बॅँकेने हात वर केल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी रिझर्व्ह बॅँकेने दिलेले निर्देश बासनात बांधून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने दिलेल्या बाराशे कोटींच्या उद्दिष्टाऐवजी त्यापेक्षा जास्त सतराशे कोटींचे कर्जवाटप करून घेऊन आर्थिक कोंडीला आमंत्रण दिल्याचा आता आरोप होत आहे. त्यातच नोटाबंंदीच्या काळात साडेतीनशे कोटींच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने जिल्हा बॅँकेची आर्थिक कोंडी सुरू झाली होती. त्यातच कर्जमाफीचे ‘वारे’ वाहू लागल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अडीच हजार कोटींपेक्षा जास्त पीककर्जाची थकबाकी सभासद शेतकऱ्यांकडे राहिली आहे. त्यातच रविवारी (दि. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या मंत्र्यांच्या उच्चस्तरीय गटातील सदस्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारपासून लगेचच पीककर्ज वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.