शहर सुधार समितीला प्रस्तावांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:21 AM2017-10-01T00:21:41+5:302017-10-01T00:21:53+5:30
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात विषय समित्या गठित केल्या परंतु, आरोग्य समितीवगळता विधी आणि शहर सुधार समित्यांपुढे प्रशासनाकडून प्रस्तावच येत नसल्याने गेल्या महिना-दीड महिन्यांपासून दोन्ही समित्यांच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. समित्यांच्या सभापतींना दिलेल्या सुविधांबाबतही ओरड कायम आहे.
नाशिक : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात विषय समित्या गठित केल्या परंतु, आरोग्य समितीवगळता विधी आणि शहर सुधार समित्यांपुढे प्रशासनाकडून प्रस्तावच येत नसल्याने गेल्या महिना-दीड महिन्यांपासून दोन्ही समित्यांच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. समित्यांच्या सभापतींना दिलेल्या सुविधांबाबतही ओरड कायम आहे. सत्ताधारी भाजपाने आपल्या जास्तीत जास्त सदस्यांना सत्तेत सहभाग मिळावा म्हणून विधी, आरोग्य आणि शहर सुधार या तीन समित्या नव्याने गठित करण्यात आल्या. आरोग्य समितीच्या सभापतिपदाची धुरा सतीश कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापतिपदी भगवान दोंदे, तर विधी समिती सभापतिपदी शीतल माळोदे सांभाळत आहेत. महासभेने या समित्यांना दहा लाखापर्यंत खर्चाचे अधिकार दिले असले तरी नगरसचिव विभागाने त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. आॅगस्ट २०१७ मध्ये या तिनही समित्यांच्या पहिली बैठक घेण्यात आली. त्यात, विधी समितीची सभा २२ आॅगस्टला, तर शहर सुधार समितीची ८ आॅगस्टला सभा झाली. परंतु, त्यानंतर समितीपुढे एकही प्रस्ताव प्रशासनाकडून प्राप्त न झाल्याने दुसºया सभेला मुहूर्तच लाभू शकलेला नाही. त्यामुळे दोन्ही सभापती केवळ कक्षापुरतेच मर्यादित ठरले आहेत. आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी मात्र सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतल्याने समितीच्या आतापर्यंत तीन सभा पार पडल्या आहेत शिवाय, समितीच्या सदस्यांनी रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी दौरेही केले आहेत. विधी व शहर सुधार समितीला मात्र अद्याप प्रशासनाने ताकास तूर लागू दिलेला नाही. विषय कोणते द्यायचे, याच गोंधळात प्रशासन अडकले आहेत. त्यामुळे समितीचे सभापतीही आपल्या कार्यकक्षांबाबत संभ्रमित आहेत.
वाहनसौख्य नाही
तीनही समितींच्या सभापतींसाठी नवीन वाहने खरेदी करण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु, अद्याप खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे चार महिने उलटून गेले तरी सभापतींना नवीन वाहनसौख्य लाभू शकलेले नाही. समिती सभापतींना कक्ष पुरविण्यात आले असले तरी त्याबाबतही सभापती समाधानी नाहीत. आरोग्य समितीच्या सभापतींनी याबाबत महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत अडचणींचा पाढा वाचला होता.